परेश मोकाशी दिग्दर्शित 'नाच गं घुमा'चा ट्रेलर झाला प्रदर्शित

आत्तापर्यंत प्रदर्शित झालेला टिझर आणि गाणी यातून हा वेगळ्या विषयावरील चित्रपट आहे आणि  त्यात मोलकरीण व तिच्या मालकिणीची रंजक कथा गुंफण्यात आली असल्याचे समोर येते.

Updated: Apr 18, 2024, 04:38 PM IST
परेश मोकाशी दिग्दर्शित 'नाच गं घुमा'चा ट्रेलर झाला प्रदर्शित title=

मुंबई : 'हिरण्यगर्भ मनोरंजन' निर्मित, परेश मोकाशी दिग्दर्शित आणि मुक्ता बर्वे व नम्रता संभेराव यांच्या प्रमुख भूमिका असलेला मराठी चित्रपट 'नाच गं घुमा'चा ट्रेलर नुकताच प्रकाशित करण्यात आला आहे.  चित्रपटाचं पोस्टर,  शीर्षक गीत आणि गडबड गीत  तसंच टिझर यांच्या टप्प्याटप्प्याने केलेल्या  प्रकाशनाला प्रेक्षकांनी दिलेल्या तुफान प्रतिसादानंतर आलेल्या या ट्रेलरमुळे  रसिकांची या चित्रपाटाबद्दलची  उत्कंठा आणखी ताणली जाणार आहे.   

आत्तापर्यंत प्रदर्शित झालेला टिझर आणि गाणी यातून हा वेगळ्या विषयावरील चित्रपट आहे आणि  त्यात मोलकरीण व तिच्या मालकिणीची रंजक कथा गुंफण्यात आली असल्याचे समोर येते. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख जवळ आली असताना प्रदर्शित झालेल्या ट्रेलरने कथेचे आणखी काही पैलू समोर आणले आहेत. प्रत्येकाच्या घरात घडणारी कथा पण तरीही ती वेगळी आहे. प्रत्येकाच्या आसपासचे संवाद पण तरीही ते मनोरंजन करून जातात. मोलकरीण हा म्हटला तर  छोटा पण कधी कधी तो सर्वात महत्त्वाचा विषय ठरतो. याच गोष्टी या ट्रेलरमधून येतात आणि मोलकरून रजेवर गेली किंवा काम सोडून गेली तर काय धर्मसंकट ओढवते त्याची झलक मिळते. चित्रपटातील सर्व प्रमुख कलाकार या  ट्रेलरमधून दिसतात आणि त्यातूनही एका सशक्त कथेची व तेवढ्याच दर्जेदार अभिनयाची चुणूक दिसून येते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

घरातील कामवाली ज्या गोष्टी लीलया करते, त्या करताना आपली कशी त्रेधा तिरपीट  उडते आणि घराचा कसा विचका उडतो, या गोष्टी या ट्रेलरमधून समोर येतात. त्यातून मनोरंजन तर होतेच पण संदेशही नकळत दिला जातो. 

महिलाप्रधान चित्रपट म्हणून आणि त्याच्या वेगळ्या विषयामुळे 'नाच गं घुमा' कामगार दिनी १ मे २०२४ रोजी प्रदर्शित होत आहे. महिलांभोवती फिरणारी ही कथा असून नामवंत महिला कलाकारांनी 'नाच गं घुमा'मध्ये अभिनयाची जबाबदारी यशस्वीपणे आपल्या खांद्यावर पेलली आहे. मुक्ता आणि नम्रता यांच्या जोडीला सुकन्या कुलकर्णी,सुप्रिया पाठारे,  सारंग साठे, मधुगंधा कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत आणि  बालकलाकार मायरा वायकुळ या आघाडीच्या आणि नावाजलेल्या कलाकारांच्या  चित्रपटात महत्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाच्या संपूर्ण वितरणाची जबाबदारी ‘पॅनोरमा स्टुडीओज’ने स्वीकारली आहे.

"चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जवळ येत असताना निर्मात्यांनी  आधी पोस्टर, मग शीर्षक गीत नाच गं  घुमा, कशी मी नाचू... प्रकाशित केले. त्यांना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला. मग दुसरे गाणे म्हणजे गडबडगीत प्रकाशित झाले. त्यालाही प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.  चित्रपट कधी प्रदर्शित होतोय, याची आम्ही वाट पाहतोय अशा प्रतिक्रिया आमच्याकडे यायला लागल्या आहेत. प्रतिक्षेची घडी संपत आली असून १ मे पर्यंत प्रेक्षकांना या टिझर आणि ट्रेलरवर समाधान मानावे लागणार आहेत," स्वप्नील जोशी म्हणतात.

मधुगंधा, परेश, स्वप्नील या मंडळींचा नुकताच आलेला 'वाळवी' चित्रपटगृहांमध्ये प्रचंड गाजला आणि लोकप्रिय झाला. हरीश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी, चि व चि सौ कां, आत्मपॅम्प्लेट, वाळवी यांसारख्या दर्जेदार व गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती केलेल्या टीमची 'नाच गं घुमा' ही पुढील प्रस्तुती आहे.