...म्हणून शाहरुख घराणेशाहीचा नवा 'किंग'; नेटकऱ्यांची टीका

पाहा असं झालं तरी काय ..... 

Updated: Jun 19, 2019, 10:28 AM IST
...म्हणून शाहरुख घराणेशाहीचा नवा 'किंग'; नेटकऱ्यांची टीका  title=

मुंबई : बऱ्याच सेलिब्रिटींची मुलं विविध रुपांनी या कलाविश्वात पदार्पण करत असतानाच यात आता आणखी एक नाव जोडलं गेलं आहे. त्या नावाची चर्चाही अनेक दिवसांपासून पाहायला मिळत आहे. अभिनेता शाहरुख खान याचा मोठा मुलगा आर्यन खान याच्याविषयीच्या या चर्चा. आर्यन अखेर या चित्रपटांच्या दुनियेत पदार्पणासाठी सज्ज झाला आहे. पण, यावेळीतो रुपेरी पडद्यावर नव्हे तर पडद्यामागूनच प्रेक्षकांची भेट घेणार आहे.

कारण 'द लायन किंग' या हिंदी चित्रपटातून तो एका महत्त्वाच्या म्हणजेच थेट 'सिम्बा'च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आर्यन हा 'सिम्बा' या पात्रासाठीचा आवाज ध्वनीमुद्रीत करणार आहे. खुद्द शाहरुखही त्याच्या मुलाला या टप्प्यावर साथ देणार आहे. 

'द लायन किंग' या चित्रपटातून तो 'मुफासा'च्या पात्रासाठी आवाज देणार आहे. ज्याविषयी शाहरुखनेच सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली होती. त्याने नुकतेच या चित्रपटाचे पोस्टरही प्रदर्शित केले.

सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने ही अतिशय महत्त्वाची बाब जाहीर करताच नेटकऱ्यांनी मात्र बॉलिवूडच्या या 'किंग'ला धारेवर धरलं. 'नेपोटिझम किंग....', असं म्हणत त्याच्यावर अनेकांनीच तोफ डागली. 'घराणेशाहीचा नवा किंग' असं म्हणत त्याला अनेकांनीच निशाण्यावर घेतलं. उपरोधिक ट्विट करत अनेकांनीच ही गोष्ट खटकली असल्याचं स्पष्ट केलं. 

घराणेशाही म्हटल्यावर चित्रपट विश्वात एक नाव लगेचच समोर येतं. किंबहुना नेटकऱ्यांनीच त्या नावाला घराणेशाहीचा प्रणेत अशी जोड दिली आहे. ते नाव म्हणजे चित्रपट निर्माता- दिग्दर्शक करण जोहरचं. पण, आता मात्र शाहरुखचा उल्लेख घराणेशाहीचा किंग म्हणून करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच त्याची मुलगी सुहाना हिसुद्धा चित्रपट विश्वात पदार्पणासाठी सज्ज असल्याचं म्हटलं गेलं होतं. त्यामुळे एकंदरच पुन्हा एकदा 'द लायन किंग'च्या निमित्ताने घराणेशाहीच्या वादाचीच डरकाळी फोडली गेली आहे हे स्पष्ट होत आहे.