‘ते’ १०० रुपयांच्या गुंतवणुकीतून बनले 'बबन'सिनेमाचे निर्माते

Amit Ingole Amit Ingole | Updated: Feb 22, 2018, 11:09 PM IST
‘ते’ १०० रुपयांच्या गुंतवणुकीतून बनले 'बबन'सिनेमाचे निर्माते title=

मुंबई : कोणतीही गोष्ट करावयाचे मनात असले, कि काहीतरी मार्ग हा सुचतोच! माणसाला कोणतीच गोष्ट अशक्य नाही, त्याची इच्छा मात्र पाहिजे, हे सूचित करणारे 'इच्छा तेथे मार्ग' हि म्हण आपल्या मराठीत प्रचलित आहे. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपट 'ख्वाडा' चे दिग्दर्शक भाऊराव क-हाडे यांना आगामी 'बबन'सिनेमादरम्यान याची चांगलीच प्रचीती आली. 

आपली शेतजमीन विकून 'ख्वाडा' सिनेमाचा डोलारा मोठ्या पडद्यावर सादर करणा-या भाऊरावांच्या डोक्यात आगामी 'बबन' सिनेमाची तयारी सुरु होती. मात्र आर्थिक तुटवड्यामुळे त्यांची दिग्दर्शनाची इच्छा अपूर्ण राहत होती. अशावेळी, 'ख्वाडा' सिनेमा पाहिलेल्या दोन प्रेक्षकांनी त्यांना खुशीने दिलेल्या १०० रुपयांच्या बक्षिसातून 'बबन' च्या निर्मितीचा मार्ग सापडला.

मनोहर मुंगी आणि जोशी काका अश्या या दोन प्रेक्षकांनी दिलेली हि शंभरची नोट बबन सिनेमाच्या निर्मिती मार्गावर खारीचा वाटा ठरली. आपल्या सिनेमाला मिळालेल्या या पहिल्या मदतनीसांचा दिग्दर्शक भाऊराव क-हाडे 'बबन'चे सहनिर्माते म्हणून उल्लेख करतात. २०१५ रोजी 'ख्वाडा' सिनेमाने गाजवलेले राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आपणास सर्वश्रुत आहे. त्यादरम्यान ११ जानेवारी २०१५ रोजी झालेल्या पुणे फेस्टिवलमध्येदेखील 'ख्वाडा'ने आपला दबदबा कायम राखला होता. त्यावेळेस या महोत्सवात आलेल्या लाखो प्रेक्षकांनी 'ख्वाडा' ला पसंती दिली होती. मनोहर मुंगी आणि जोशी काका या दोन प्रेक्षकांनी तर सिनेमा पाहून आल्यानंतर  खास भाऊरावांची भेट घेतली होती. 

'आपण नाट्यक्षेत्रातली माणसे असून, आम्हाला सिनेमाबद्दल अधिक काही सांगता येणार नाही. मात्र तुम्ही जे काही सादर केले आहे, ते खूप अप्रतिम होते', या शब्दात त्यांनी भाऊरावांचे कोडकौतुक करत आपल्याकडील १०० रुपये त्यांना बक्षीस म्हणून देऊ केले. भाऊराव सांगतात कि, 'मी ते पैसे घेत नव्हतो. मात्र त्यांनी हे पैसे आम्ही तुला खाऊ म्हणून नव्हे तर तुझ्या आगामी सिनेमाच्या निर्मितीमध्ये याचा वापर कर, असे सुचवले', त्यामुळे त्यांचा आशीर्वाद समजून मी ते पैसे घेतले, आणि 'बबन'च्या मुहूर्तावर त्याचा वापर केला असल्याचे भाऊराव सांगतात. या दोन्ही प्रेक्षकांचा सन्मान करण्यासाठी भाऊरावांनी 'बबन' सिनेमाच्या क्रेडीट लिस्टमध्ये त्यांचा विशेष सहनिर्माता म्हणून उल्लेख केला आहे.

द फोक कोनफ्लूअन्स इंटरtटेंटमेंट प्रस्तुत आणि चित्राक्ष फिल्म्स निर्मित या सिनेमाची विठ्ठलराव कऱ्हाडे, प्रमोद भास्कर चौधरी, मोनाली संदीप फंड आणि भाऊसाहेब शिंदे यांनी निर्मिती केली आहे. येत्या २३ मार्च रोजी सर्वत्र प्रदर्शित होत असणा-या या सिनेमाचे भाऊरावांनी लेखनदेखील केले असून, 'ख्वाडा' अभिनेता भाऊसाहेब शिंदेची यात प्रमुख भूमिका आहे, त्याच्यासोबत गायत्री जाधव ही नवोदित अभिनेत्री 'बबन' मध्ये झळकणार आहे.