बिल्डरविरोधात सायरा बानूंचा अब्रूनुकसानीचा दावा

इतक्या कोटींचा दावा त्यांनी ठोकत समीर भोजवानीला एक नोटीस पाठवली आहे.   

Updated: Jan 5, 2019, 11:05 AM IST
बिल्डरविरोधात सायरा बानूंचा अब्रूनुकसानीचा दावा  title=

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार आणि त्यांची पत्नी सायरा बानू यांनी बिल्डर समीर भोजवानी याच्याविरोधात २०० कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकला आहे. सायरा बानू यांनी केलेल्या आरोपांनुसार भोजवानी हा त्यांच्या बंगल्यावर हक्क सांगत असून, आपली प्रतिमा मलिन करत आहे. 

मुंबईच्या वांद्रे परिसरातील पाली हिल येथील उच्चभ्रू भागात कुमार यांचा बंगला आहे. त्याचसंदर्भात समीर भेजवानी यांना पाठवलेल्या नोटीसमध्ये दिलीप कुमार आणि त्यांची पत्नी सायरा बानू यांचा मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या छळ करण्यासाठीची नुकसानभरपाई म्हणून भोजवानीकडून २०० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. ही नोटीस म्हणजे भोजवानीच्याच नोटीसला देण्यात आलेलं उत्तर आहे, ज्यामध्ये त्याने कुमार यांच्या २५० कोटींच्या बंगल्यावर आपला मालकी हक्क सांगितला होता. 

यापूर्वी बानू यांनी मदतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडेही धाव घेतली होती. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी मोदींना मदत करण्यासाठीची विनंती करत या प्रकरणाकडे त्यांचं लक्ष वेधलं होतं. 

भोजवानीविरोधात बानू यांचा हा लढा बऱ्याच काळापासून सुरू आहे. याआधीही त्यांनी पोलिसांची मदत घेत भोजवानीविरोधात तक्रार दाखल केली होती. २०१८ च्या जानेवारी महिन्यात ईओडब्ल्यूकडून भोजवानीविरोधात बंगल्याचा भूखंड हडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं म्हणत खटला दाखल करण्यात आला होता. भोजवानीने संबंधित भूखंडाची खोटी कागदपत्र तयार केल्याचा संशय पोलिसांना होता. ज्यानंतर ईओडब्ल्यूच्या एका चमूने भोजवानी यांच्या घरी छापा मारला होता. त्यावेळी त्यांच्या घरातून काही शस्त्रही जप्त करण्यात आली होती. ज्यानंतर त्याच वर्षी एप्रिल महिन्यात त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं.