‘ही माझी मुलगीच नाही…’ राणी मुखर्जीच्या जन्मानंतर असं का म्हणालेली तिची आई?

राणी मुखर्जीचा जन्म 21 मार्च 1978 रोजी मुंबईत झाला होता. पण तिच्या जन्माच्या वेळी तिच्या आईने ‘ही माझी मुलगीच नाही’ असं डॉक्टरांना सांगितलं होतं.

Updated: Mar 21, 2024, 08:48 PM IST
‘ही माझी मुलगीच नाही…’ राणी मुखर्जीच्या जन्मानंतर असं का म्हणालेली तिची आई? title=

Rani Mukerji Exchanged During Birth : 90 च्या दशकात बॉलिवूड गाजवणाऱ्या असंख्य अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणून राणी मुखर्जीला ओळखले जाते. राणीने आतापर्यंत अनेक दमदार चित्रपटात भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. राणीने ‘राजा की आएगी बारात’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण तिला खरी लोकप्रियता बॉलिवूडचा किंग खान आणि काजोलचा चित्रपट ‘कुछ कुछ होता है’ यामुळे मिळाली. राणी मुखर्जी आज (21 मार्च) तिचा 46 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने आपण तिच्या जन्माचा किस्सा जाणून घेणार आहोत. 

राणी मुखर्जीचा जन्म 21 मार्च 1978 रोजी मुंबईत झाला होता. पण तिच्या जन्माच्या वेळी तिच्या आईने ‘ही माझी मुलगीच नाही’ असं डॉक्टरांना सांगितलं होतं. याबद्दल स्वत: राणी मुखर्जीनेच एका मुलाखतीदरम्यान खुलासा केला होता. काही वर्षांपूर्वी राणी मुखर्जीने ‘एबीपी न्यूज’ या वृत्तवाहिनीला एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीवेळी तिने तिच्या जन्मावेळी घडलेला फारच मजेशीर किस्सा शेअर केला होता. 

राणी मुखर्जीने स्वत:च सांगितलेला मजेशीर किस्सा

"माझा जन्म झाला त्यावेळी मी एका पंजाबी कुंटुबाकडे सापडले होते आणि माझ्या आई- वडिलांकडे त्या दाम्पत्याची मुलगी होती. माझ्या आईनं जेव्हा त्या मुलीला पाहिलं, तेव्हा ती डॉक्टरांना म्हणाली ही माझी मुलगीच नाही, हिचे डोळे तपकिरी नाहीत. तुम्ही आताच्या आता जा आणि माझ्या मुलीला शोधून आणा. माझ्या जन्माच्या दरम्यान एका पंजाबी कुटुंबातील मुलीसोबत माझी अदलाबदली झाली होती. विशेष म्हणजे माझ्या आईला तिच्याकडे असलेली मुलगी ही तिची मुलगी नाही, हे त्याचवेळी समजले होते. 

त्यामुळे तिने संपूर्ण रुग्णालयात शोधाशोध केली. बराच वेळ शोध घेतल्यानंतर मी एका पंजाबी कुटुंबाकडे सापडले. यावरुन माझे कुटुंब मला अजूनही चिडवत असतात. तू खरंच एका पंजाबी कुटुंबातील आहेस. पण चुकून तू आमच्या कुटुंबात आली आहेस, असे ते अनेकदा मला मस्करीत म्हणतात", असा किस्सा राणी मुखर्जीने मुलाखतीदरम्यान शेअर केला होता. 

आदित्य चोप्रासोबत बांधली लग्नगाठ

दरम्यान राणी मुखर्जी ही प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते राम मुखर्जी आणि कृष्णा मुखर्जी यांची मुलगी आहे. राजा मुखर्जी असे तिच्या मोठ्या भावाचे नाव आहे. ती अभिनेत्री काजोल आणि दिग्दर्शक अयान मुखर्जी यांची चुलत बहीण आहे. राणी मुखर्जीने 2014 मध्ये आदित्य चोप्रासोबत लग्नगाठ बांधली. त्या दोघांना अदिरा नावाची एक गोंडस मुलगी आहे.