कोण पटकावणार “महाराष्ट्राचा फेव्हरेट अभिनेता” पुरस्कार? रंगली स्पर्धा, वाढली चुरस

आता, महाराष्ट्राचा फेव्हरेट अभिनेता प्रेक्षकांच्या मतावरच ठरणार आहे. प्रेक्षकांच्या मतांनुसार निवडलेला विजेता अभिनेता झी टॉकीज वाहिनीतर्फे जाहीर होईल, त्यासाठी वोटिंग सुरू झालं आहे. 

Updated: Jan 14, 2023, 08:02 PM IST
कोण पटकावणार “महाराष्ट्राचा फेव्हरेट अभिनेता” पुरस्कार? रंगली स्पर्धा, वाढली चुरस title=

वर्षभर केलेल्या कामाचं कौतुक व्हावं, पुरस्कार मिळावा असं प्रत्येकाला वाटत असतं. त्यात हा पुरस्कार थेट प्रेक्षकांकडून मिळणार असेल तर क्या बात है. मायबाप प्रेक्षकांच्या पसंतीच्या पावतीची तर कलाकार वाटच पाहत असतात. झी टॉकीज वाहिनी दरवर्षी प्रेक्षक आणि कलाकार यांच्यातील हाच धागा जोडत असते. महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? या सोहळयाच्या मंचावर पुरस्कार स्वीकारणं म्हणजे कलाकारांसाठी पर्वणीच. या पर्वणीसाठी मराठी अभिनेत्यांची नावं नामांकित करण्यात आली आहेत. यामध्ये अभिनेता प्रसाद ओक, आदिनाथ कोठारे, भाऊ कदम, मकरंद अनासपुरे, शरद केळकर, प्रथमेश परब, ललित प्रभाकर आणि अमेय वाघ यांची वर्णी लागली आहे. आता, महाराष्ट्राचा फेव्हरेट अभिनेता प्रेक्षकांच्या मतावरच ठरणार आहे. प्रेक्षकांच्या मतांनुसार निवडलेला विजेता अभिनेता झी टॉकीज वाहिनीतर्फे जाहीर होईल, त्यासाठी वोटिंग सुरू झालं आहे. फेव्हरेट अभिनेत्याला मत देण्यासाठी https://mfk.zee5.com या वेबसाइटवर किंवा ९१६०००१२१० या झी टॉकीजच्या अधिकृत व्हॉटसअॅप क्रमांकावर तुमचं मत नोंदवू शकता.  

झी टॉकीज वाहिनीतर्फे १५ डिसेंबरला महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण या पुरस्काराची नामांकने दणक्यात जाहीर झाली. आपल्या आवडत्या अभिनेत्याला मत नोंदवण्यासाठी प्रेक्षकांचा उत्साह वाढत आहे. नामांकन मिळालेले सर्वच अभिनेत्यांनी त्यांच्या भूमिका चोख बजावल्या आहेत, आता यामधून महाराष्ट्राचा फेव्हरेट अभिनेता निवडून प्रेक्षक त्यांची भूमिका बजावण्यासाठी सज्ज झाले आहेत. अर्थातच झी टॉकीज या वाहिनीवर हा सोहळा पाहण्याची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे.

यंदाचं वर्ष हे अभिनेता प्रसाद ओकसाठी खूपच स्पेशल होतं असं म्हणावं लागेल. प्रसादला धर्मवीर या सिनेमातून जबरदस्त भूमिका मिळाली. महाराष्ट्राचा ढाण्या वाघ अशी ओळख असलेल्या आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारीत या सिनेमात आनंद दिघे यांची भूमिका प्रसादने जीवंत केली. त्याच्या लुकपासून ते अभिनयापर्यंत प्रत्येक गोष्ट हिट झाली. या सिनेमाने अनेक रेकॉर्ड तोडले. धर्मवीर… मुक्काम पोस्ट ठाणे या सिनेमासाठी प्रसादला महाराष्ट्राचा फेव्हरेट अभिनेता या स्पर्धेत नामांकन मिळाले आहे. या पुरस्कारावर प्रसादचं नाव कोरलं जाणार का हे प्रेक्षकांची मतच ठरवणार आहेत.
 
चंद्रमुखी या सिनेमानेही गेलं वर्ष गाजवलं. या सिनेमातील चंद्राच्या भूमिकेचं जितकं कौतुक झालं तितकच दौलतरावांनाही पसंतीची पोहोच मिळाली. खरंतर आदिनाथच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर असलेला दौलतराव त्याने उत्तम साकारला. एक मुत्सदी राजकारणी ते हळवा प्रियकर या छटा आदिनाथच्या अभिनयाची ताकद दाखवणाऱ्या होत्या. आदिनाथच्या याच भूमिकेमुळे तो महाराष्ट्राचा फेव्हरेट अभिनेता या यादीत समाविष्ट झाला आहे. त्यामुळे आदिनाथच्या चाहत्यांनाही प्रतीक्षा लागली आहे.
 
विनोदी अभिनेता होणं सोप्पं नाही. विनोदाचं टायमिंग सापडलेल्या अभिनेत्यांनी मराठी सिनेमा आजवर अजरामर केला आहे. यामध्ये भाऊ कदम हे नाव खूपच लोकप्रिय आहे. छोट्या पडद्यावरील विनोदी प्रहसन ते मोठ्या पडद्यावरील सशक्त भूमिका हा भाऊचा प्रवास उल्लेखनीय आहे. पांडू या सिनेमातील भाऊची मुख्य भूमिका गाजली. या सिनेमासाठी भाऊची महाराष्ट्राचा फेव्हरेट अभिनेता या पुरस्काराच्या नामांकनासाठी निवड होताच त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
 
दे धक्का या सिनेमाने अभिनेता मकरंद अनासपुरे यांच्या कारकीर्दीला कलाटणी दिली.  १४ वर्षांनंतर या सिनेमाच्या दे धक्का २ या सिक्वेलनेही धमाल उडवली. मराठवाडी बोली लोकप्रिय करणाऱ्या मकरंदने दे धक्का सिनेमाच्या दोन्ही पर्वात प्रेक्षकांची मनं जिंकली. गाडीचा पार्ट बनवणारा साधा मेकॅनिक मकरंद जाधव ते यशस्वी उद्योजक म्हणून लंडनला पुरस्कार स्वीकारण्यासाठी गेलेला उद्योगपती मकरंद जाधव या दोन्ही छटा मकरंदने लिलया पेलल्या आहेत. खळखळून हसता हसता टचकन डोळे पाणावण्याची किमया मकरंदच्या अभिनयात आहे. त्याच्या याच बळावर महाराष्ट्राचा फेव्हरेट अभिनेता या यादीत त्याला स्थान मिळालं आहे. त्यामुळे हा पुरस्कार मकरंदच्या नावावर झाला तर आश्चर्य वाटायला नको.
 
भालजी पेंढारकरांच्या काळातील छत्रपती शिवाजी महाराज साकारणाऱ्या चंद्रकांत, सूर्यकांत या अभिनेत्यांचा वारसा चालवणाऱ्या शरद केळकरच्या नसानसात शिवाजी महाराज भिनले आहेत. पण नवं काहीतरी करण्याची आस अभिनेत्याला कायमच असते. याच भावनेतून बाजीप्रभू देशपांडे यांच्या रूपातही शरद केळकरने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं ते हर हर महादेव या सिनेमातून. शरदच्या आवाजाला असलेली धार त्याच्या संवादफेकीला अधिकच बळ देते. शरदने साकारलेल्या बाजीप्रभू देशपांडे या व्यक्तीरेखेसाठी त्याला महाराष्ट्राचा फेव्हरेट अभिनेता म्हणून नामांकन मिळालं आहे.

बिनधास्त नायकाचा चेहरा मराठी सिनेमाला देणाऱ्या प्रथमेश परबचा एक स्वतंत्र चाहतावर्ग आहे. टाइमपास सिनेमातील कोवळ्या वयातील अवखळ प्रेमकथा मांडत प्रथमेशने त्याच्या सहजसुंदर अभिनयाचं दर्शन घडवलं. टाइमपास ३ या सिनेमात दगडूच्या आयुष्यात प्राजूच्या जागी टपोरी पालवी ही मुलगी आली आणि दगडूचा रंगच बदलला. हा बदल अफलातून दाखवणाऱ्या प्रथमेश परबचंही नाव महाराष्ट्राचा फेव्हरेट अभिनेता या विभागात दाखल झालं आहे.

कल्पनेतील गोष्ट आयुष्यात आली तर काय भंबेरी उडेल हे दाखवणाऱ्या झोंबिवली या मराठीतील पहिल्या झॉमकॉम सिनेमाने हॉरर कॉमेडीची मजा दिली. या सिनेमातील रावडी विश्वास म्हणजे ललित प्रभाकर आणि साधा सरळ नवरा म्ह्णजे सुधीर अमेय वाघ यांची जोडी चांगलीच गाजली. पहिल्यांदाच एकत्र स्क्रिनवर दिसलेल्या ललित आणि अमेयने या सिनेमातील थरार आणि कॉमेडीचा तडका यांचा बॅलन्स केलाय. या झोंबीपटातील भन्नाट अभिनयासाठी ललित आणि अमेय यांनाही महाराष्ट्राचा फेव्हरेट अभिनेता या नामांकनात स्थान मिळालं आहे.
 
महाराष्ट्राची फेव्हरेट अभिनेता कोण या पुरस्कारासाठी प्रसाद ओक, आदिनाथ कोठारे, भाऊ कदम, मकरंद अनासपुरे, शरद केळकर, प्रथमेश परब, ललित प्रभाकर आणि अमेय वाघ यांच्यापैकी फेव्हरेट अभिनेत्याला मत देण्यासाठी https://mfk.zee5.com या वेबसाइटवर किंवा ९१६०००१२१० या झी टॉकीजच्या अधिकृत व्हॉटसअॅप क्रमांकावर तुमचं मत नोंदवू शकता.