'कितीही नाट्यमय वाटलं तरी...', सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाल्यानंतर अमृता देशमुखने व्यक्त केल्या भावना

अभिनेत्री अमृता देशमुखला व्यावसायिक नाटकासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. यानिमित्ताने तिने एक पोस्ट शेअर केली आहे. 

Updated: Mar 10, 2024, 09:16 PM IST
'कितीही नाट्यमय वाटलं तरी...', सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाल्यानंतर अमृता देशमुखने व्यक्त केल्या भावना title=

Amruta Deshmukh Zee Natya Gaurav 2024 : झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळा हा कायमच विविध कारणांनी चर्चेत असतो. या पुरस्काराने मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. या पुरस्काराचे नामांकन मिळालं म्हणजे आपल्या कामाची दखल घेतली गेली तर पुरस्कार मिळाले म्हणजे आपल्या कामाची पोचपावती मिळाली अशी भावना कलाकारांच्या मनात असते. नुकतंच अभिनेत्री अमृता देशमुखला व्यावसायिक नाटकासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. यानिमित्ताने तिने एक पोस्ट शेअर केली आहे. 

अमृता देशमुख ही ‘फ्रेशर्स’, ‘तुमचं आमचं सेम असतं’, ‘मी तुझीच रे’ या मालिकांमधून घराघरात पोहोचली. सध्या ती ‘नियम व अटी लागू’ या नाटकात झळकत आहे. सध्या तिचे हे नाटक रंगभूमीवर जोरदार सुरू आहे. या नाटकात अमृतासह संकर्षण कऱ्हाडे, प्रसाद बर्वे हे कलाकारही झळकत आहेत. आता याच नाटकासाठी अमृताला ‘झी नाट्य गौरव’चा सर्वात्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. यानिमित्ताने तिने एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. 

अमृता देशमुखची इन्स्टाग्राम पोस्ट 

"झी नाट्य गौरव" हा असा सोहळा आहे जो मी आमच्या छोट्याश्या TV वर उत्साहाने बघायचे...आणि स्वप्नं सुद्धा बघायचे..तिथे असण्याची..कितीही नाट्यमय वाटलं तरी खरंच होतं तसं...! आता जेव्हा "सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- व्यावसायिक नाटक" ची ट्रॉफी माझ्या हातात बघते..तेव्हा आयुष्य एखाद्या नाटकापेक्षा कमी नाही वाटत..ज्यांनी ही संधी दिली ते प्रशांत दामले सर आणि माझं नाव "नियम व अटी लागू" साठी त्यांना सुचवणारी कविता ताई...ह्यांच्याच हस्ते हा पुरस्कार मला मिळाला हा "निव्वळ योगायोग" ! खरं सांगायचं तर हे दोघे स्टेज वर आले तेव्हा तर माझी खात्रीच पटली की "छे! असा योग खऱ्या आयुष्यात नाही"च" येत!" आणि म्हणूनच वाटतं.. “क्या पता हम में है कहानी या हैं कहानी में हम?” असे अमृता देशमुखने पोस्टमध्ये म्हटले आहे. 

अमृताच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. अमृताच्या या पोस्टवर प्रसाद जवादेने “माझी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री” अशी कमेंट केली आहे. तर शंतनु मोघे, कृतिका देव, अभिषेक देशमुख, तेजस्विनी लोणारी, पल्लवी पाटील या कलाकारांनीही अमृताला शुभेच्छा दिल्या आहेत. 

दरम्यान, अमृताच्या ‘नियम व अटी लागू’ या नाटकाला ‘झी नाट्य गौरव’ पुरस्कारामध्ये 8 नामांकने मिळाली आहेत. यात सर्वोत्कृष्ट लेखन, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता, सर्वोत्कृष्ट नाटक, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट संगीत आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता या विभागांचा समावेश आहे.