गुलमोहरमध्ये बहरणार 'वडापाव वेड्स खांडवी' ही प्रेमकथा!

गुलमोहर ही झी युवावरील मालिकेची लोकप्रियता अलिकडे वाढू लागली आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Mar 1, 2018, 07:20 PM IST
गुलमोहरमध्ये बहरणार 'वडापाव वेड्स खांडवी' ही प्रेमकथा! title=

मुंबई : गुलमोहर ही झी युवावरील मालिकेची लोकप्रियता अलिकडे वाढू लागली आहे. या मालिकेची खासियत म्हणजे यात केवळ दोन भागात हृदयस्पर्शी कथा दाखवण्यात येते. आता या मालिकेच्या पुढच्या भागात गोंडस अभिनेत्री सायली संजीव आणि डॅशिंग अभिनेता संग्राम साळवी यांची प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. मराठी आणि गुजराती खाद्य संस्कृतीची ओळख, त्यावर सुरु असणारा कुटुंबाचा धंदा आणि त्यातून घडणारे प्रेम या कथेतून प्रेक्षकांना पाहायला मिळेल. 

काय आहे कथा?

युवराज, ज्याचे वडील वर्षोनवर्षे महाराष्ट्राची ओळख असलेला वडापाव चा धंदा करत असतात, तर या धंद्याला चॅलेंज देण्यासाठी गुजरात ची खांडवी घेऊन सेजल येते आणि त्यानंतर सुरु होते एकमेकांचा धंदा बंद करण्याची चढाओढ. एकमेकांचा धंदा बंद करण्यासाठी सुरु असलेल्या या स्पर्धेत अनेक मजेशीर घटना घडतात. या सगळ्यात कालांतराने त्यांच्या लक्षात येते की ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. मग प्रेम की धंदा या व्दिधा मनःस्थितीत अडलेली यांची कथा म्हणजे वडापाव वेड्स खांडवी!!

मालिकेबद्दल सायली संजीव म्हणते...

सायली संजीव ला या मालिकेबद्दल विचारले असता ती म्हणाली, "मराठी नंतर बिहारी आणि आता गुजराती या तिन्ही भूमिका साकारताना तशी मला खूप मजा आली. मुंबई सारख्या शहरात सगळ्याच संस्कृती एकमेकांशी अतिशय प्रेमाने राहतात. माझ्या कॉलनी मध्ये अनेक गुजराती कुटुंब असल्यामुळे मला शब्दांची चांगली ओळख होती. त्यामुळे ही भूमिका करणे मला अतिशय सोपे गेले. ही माझी दुसरीच मालिका असल्यामुळे गुलमोहरवर माझे विशेष प्रेम आहे. या नवीन फॉरमॅट मध्ये मंदार देवस्थळी सारख्या दिग्गज दिग्दर्शकाबरोबर काम करण्याचा अनुभव अतिशय सुंदर होता."

या दिवशी होईल प्रसारीत

झी युवावरील गुलमोहर ही मालिका सोमवार मंगळवारी प्रदर्शित होते. आता  वडापाव वेड्स खांडवी ही प्रेमकथा तुम्हाला ५-६ मार्चला संध्याकाळी ९:३० ला पाहायला मिळेल.