मुंबई : अनेकांची दिवसाची सुरूवात ही चहा, कॉफीने होते. मात्र अनेकांच्या मनात चहा सेवनाविषयी अनेक समज-गैरसमज आहेत. पण खरं तर चहा हा एका प्रकारचा आयुर्वेदीक काढाच आहे. त्यामुळे प्रमाणात चहाचे सेवन केल्यास आरोग्याला त्याचा फायदा होऊ शकतो. प्रसिद्ध सेलिब्रिटी न्युट्रीशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी चहाचे सेवन आरोग्यदायी असल्याचे म्हटले आहे. सोबतच चहासेवनाबाबतचे काही समज-गैरसमज दूर केले आहेत.
चहा, कॉफी हे आरोग्याला फायदेशीर असले तरीही सकाळी उठल्याबरोबर किंवा रिकाम्या पोटी पिऊ नये. सकाळप्रमाणेच रात्री झोपण्यापूर्वी चहा, कॉफी पिणे टाळावे. दिवसभरातही जेवणासोबत चहा पिण्याची सवय टाळा.
दिवसभरात पुरेशा नाश्त्यासोबत 2-3 कप चहा, कॉफी पिणं फायदेशीर आहे.
ग्रीन टी, ग्रीन कॉफी हा प्रकार केवळ उत्पादकांच्या फायद्याचा आहे. भारतामध्ये बनवला जाणारा मसाला चहा हा दूधासोबतच घेणं केवळ रिफ्रेंशिंग पेय नव्हे तर शरीरासाठी अॅन्टी ऑक्सिडंटयुक्त पेय आहे.
चहामध्ये साखरेचा समावेश करणं फायदेशीर आहे. कारण WHO आणि इतर ग्लोबल डायबेटिस ऑर्गेनायझेशनच्या अहवालानुसार, 6-9 टीस्पुन साखरेचा आहारात समावेश करणं आरोग्यदायी आहे. मात्र छुप्या स्वरूपातील साखरेचा आहारात समावेश करणं त्रासदायक ठरू शकतं. नाश्ताला सिरिअल्स, पॅकेज्ड फ्रुट ज्युस, बिस्किट यांचा समावेश आरोग्याला त्रासदायक ठरू शकतो.