मधूमेहींंनो ! आहारात आंंब्याचा 'असा' समावेश करणं आरोग्यदायी...

 जसलोक हॉस्पिटलचे कार्डिओमेटॅबॉलिक फिजिशियन डॉ. रोहन सिक्वेरा यांनी दिलाय हा खास सल्ला 

& Updated: Apr 14, 2018, 11:47 AM IST
मधूमेहींंनो ! आहारात आंंब्याचा 'असा' समावेश करणं आरोग्यदायी...   title=

मुंबई :  उन्हाळा सुरू झाला की सहाजिकच सार्‍यांना आंब्यांचे वेध लागतात. फळांचा राजा आणि वर्षातून एकाच ऋतूमध्ये उपलब्ध असणारा आंबा उन्हाळ्याच्या दिवसात मुबलक प्रमाणात मिळतो. आबालवृद्ध आंब्याची चव चाखण्यासाठी उत्सुक असतात. परंतू मधूमेहींचं काय ? 

मधूमेह म्हटला की खाण्या-पिण्यावर बंधनं येणं सहाजिकच आहे पण वर्षातून केवळ एकदाच मिळणारा आंबा मधूमेहींनी चाखावा का? आंबा खाल्याने त्यांचा त्रास अधिक वाढेल का? असे प्रश्न अनेक मधुमेहींच्या मनात डोकावतात. तुमच्या मनातील याच प्रश्नाला मुंबईतील जसलोक हॉस्पिटलचे कार्डिओमेटॅबॉलिक फिजिशियन डॉ. रोहन सिक्वेरा यांनी खास उत्तर दिलं आहे. 

मधूमेहींनी आंबा खावा का? 

आंबा हे फळ गोड असते. त्यामध्ये नैसर्गिक स्वरूपातच साखरेचे प्रमाण मुबलक असते. त्यामुळे नैसर्गिक स्वरूपात साखर मुबलक प्रमाणात असणारी फळं मधूमेहींनी प्रमाणातच खावीत. मधूमेहींप्रमाणेच प्री- डायबेटिक असणार्‍या रूग्णांनीही काळजी घेणं आवश्यक आहे. 

फळं ही रसापेक्षा अधिक फायदेशीर  

कोणत्याही फळांचा रस पिण्यापेक्षा ती नैसर्गिक स्वरूपात आणि चावून खावी. अनेकदा फळांच्या रसामध्ये ग्लास्मिक इंडेक्स हा अधिक प्रमाणात असतो. 

मधूमेहींनी आंबा कसा खावा? 

मधूमेहीदेखील आंब्याचा आहारात समावेश करू शकतात. मात्र त्याचे प्रमाण नियंत्रणात असणं आवश्यक आहे. प्रत्येक रुग्णांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण लक्षात घेता, कॅलरीजचं गणित सांभाळून आहारात आंब्याचा समावेश करता येऊ शकतो. जसे की आंब्याची अर्धी फोड दुपारच्या आणि अर्धी फोड रात्रीच्या जेवणात समाविष्ट करू शकता. 

मधूमेहींनी आहारात आंब्याचा किंवा फळांचा समावेश करणं हे गोडाच्या पदार्थांना उत्तम पर्याय ठरू शकतो. मात्र मधूमेहींनी त्याकरिता संतुलित आहाराचे नियमित सेवन करणं आवश्यक आहे. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण  झटकन कमी- जास्त होणार नाही.  

डॉक्टरांचा खास सल्ला 

मधूमेहाचा त्रास हा प्रत्येक दिवसागणिक अधिक वाढण्याची शक्यता असते. 
दरवर्षी स्वादूपिंडातील बिटा सेल्सद्वारा होणारी इन्सुलिनची निर्मिती कमी होत जाते.  परिणामी रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. म्हणूनच मधूमेहींनी नियमित रक्तातील साखरेचे प्रमाण तपासणं गरजेचे आहे. सोबतच डॉक्टरांच्या सल्ल्याने तपासणी करणं आवश्यक आहे.