लहान मुलांमधील 'अशा' तापाकडे दुर्लक्ष नको !

वातावरणामध्ये बदल झाला की आरोग्य बिघडते. प्रामुख्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्यांमध्ये हा धोका अधिक असतो. म्हणूनच ताप आल्यानंतर पालकांमध्ये भीती वाटते. मात्र आरोग्यशास्त्रानुसार, शरीराचं तापमान वाढणं हे आजाराशी लढण्याचं एक मेकॅनिझम आहे. 

Updated: Jul 1, 2018, 02:28 PM IST
लहान मुलांमधील 'अशा' तापाकडे दुर्लक्ष नको !  title=

मुंबई : वातावरणामध्ये बदल झाला की आरोग्य बिघडते. प्रामुख्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्यांमध्ये हा धोका अधिक असतो. म्हणूनच ताप आल्यानंतर पालकांमध्ये भीती वाटते. मात्र आरोग्यशास्त्रानुसार, शरीराचं तापमान वाढणं हे आजाराशी लढण्याचं एक मेकॅनिझम आहे. 

ताप येणं म्हणजे काय? 

शरीराच तापमान जेव्हा वाढतं तेव्हा शरीरात आजार निर्माण करणार्‍या घटकांशी शरीर सामना करत असते. यामुळे शरीर आजाराला नियंत्रणामध्ये किंवा त्यावर मात करण्याचा प्रयत्न करते. मात्र म्हणून तापाकडे दुर्लक्ष करून ते अंगावर काढू नये. 

लहान मुलं आणि ताप 

तान्हा मुलांमध्ये, सहा महिन्यांपेक्षा कमी वयाच्या बाळांमधील तापाकडे दुर्लक्ष करू नये. लहान मुलांमध्ये व्हॅक्सिनेशन म्हणजेच इंजेक्शनचा डोस दिल्यानंतर, बॅक्टेरियल इंफेक्शमुळे,व्हायरल इंफेक्शनमुळे  ताप येतो. याकडे दुर्लक्ष करणं आरोग्याला धोकादायक ठरते.

व्हायरल इंफेक्शनमध्ये ताप साधारण 3-5 दिवस टिकतो. मात्र तीन दिवसांनंतरही लहान मुलांमध्ये ताप राहिल्यास तात्काळ वैद्यकीय मदत घेणं आवश्यक आहे.  

लहान मुलांच्या तापामध्ये कशाची काळजी घ्याल? 

डॉक्टरांची मदत घेण्यापूर्वी काही घरगुती उपायांनी ताप कमी करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता.  

तापाच्या प्रमाणाकडे लक्ष द्या - 

नियमित लहान मुलांमधील ताप थर्मामीटरने तपासून पहा. बाजारातील अद्यावत थर्मामीटरचा वापर करा. 37 डिग्री किंवा 97.8 फॅरॅनाईट इतके तापमान हे सामान्य आहे.  

डॉक्टरांची मदत - 

मुलांमध्ये ताप सतत वाढत असेल तर त्याकडे लक्ष द्या. स्वतः औषधं ठरवण्यापेक्षा मुलांना तात्काळ वैद्यकीय मदत देणं गरजेचे आहे. डॉक्टरांच्या सल्लयाकडे, औषधाच्या मात्रेकडे दुर्लक्ष करू नका. प्रामुख्याने डॉक्टर पॅरासिटॅमोल देतात. त्याचा ओव्हर डोस होणार नाही याची काळजी घ्या.  

कपड्यांकडे लक्ष द्या - 

अति कपडे मुलांच्या अंगावर असल्यास त्यांच्या शरीराच्या तापमानामध्ये वाढ झालेली दिसून येते. अशावेळे लोकरी कपडे, बेबी ब्लॅंकेट्स काढा. त्यांना सुती, हलके कपडे घालावेत. अति कपड्यांमुळे मुलांच्या शरीराचे तापमान वाढणं याला नकळत ताप समजला जाऊ शकतो. 

मुलांना हायड्रेटेड ठेवा - 

तापामध्ये मुलांच्या तोंडाची चव जाते. अशावेळेस त्यांना बळजबरी काही पदार्थ भरवण्याच्या, खाण्याचा अट्टाहास टाळा. पचायला हलके, पाण्याचा मुबलक समावेश असलेले पदार्थ आहारात घ्या. अशावेळेस ज्यूस, सूप, तांदळाची पेज, पेजेचं पाणी शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत होते. 

स्पॉंन्जिंग -  

पॅरॅसिटॅमोलचा डोस देऊनही ताप कमी होत नसल्यास थंड पाण्याचा वापर करा. मुलांचे शरीर थंड पाण्याने पुसावे. याकरिता फ्रीजरमधील थंड पाण्याचा वापर टाळा. नळाचे साधे  पाणी वापरा. कपाळावर थंड पाण्याचा घड्या ठेवा. 

ताप कमी न झाल्यास योग्य निदान करण्यासाठी डॉक्टर रक्ताच्या, मूत्राच्या चाचण्या करण्याचा सल्ला देतात.