WHO च्या अलर्टनंतर आरोग्य विभाग एक्शनमोडमध्ये; Cough Syrup तपासणी पथक पोहोचलं सोनीपतला

आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी कंपनीची चौकशी सुरू केलीये.

Updated: Oct 7, 2022, 06:18 AM IST
WHO च्या अलर्टनंतर आरोग्य विभाग एक्शनमोडमध्ये; Cough Syrup तपासणी पथक पोहोचलं सोनीपतला title=

मुंबई : जागतिक आरोग्य संघटनेने भारतीय कंपन्यांचे चार कफ सिरप घातक घोषित केलेत. हे कफ सिरप हरियाणातील मेडेन फार्मास्युटिकल कंपनी बनवत असल्याचं समोर आलंय. WHO च्या अलर्टनंतर आरोग्य विभागाची टीम सोनीपतमधील मेडेन फार्मास्युटिकल कंपनीत पोहोचली. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी कंपनीची चौकशी सुरू केलीये. यावेळी कारखान्यात प्रसारमाध्यमांनाही बंदी घालण्यात आली.

डब्ल्यूएचओने बुधवारी इंडियाज मेडेन फार्मास्युटिकल्स लिमिटेडने बनवलेल्या चार खोकल्याच्या सिरपबाबत अलर्ट जारी केला. डब्ल्यूएचओने म्हटलंय की, हे सर्दी-खोकल्यावरील सिरप गॅम्बियामध्ये 66 मृत्यू आणि किडीच्या गंभीर समस्यांसाठी जबाबदार असू शकतात.

समोर आलेल्या अहवालानुसार, या सिरपमध्ये डाएथिलीन ग्लायकोल आणि इथिलीन ग्लायकॉलची अयोग्य मात्रा असल्याची पुष्टी झाली आहे, जी माणसांसाठी अत्यंत धोकादायक आहेत.

हे कफ सिरप हरियाणातील मेडेन फार्मास्युटिकल कंपनी बनवतंय. डब्ल्यूएचओने विचारलेल्या कफ सिरपमध्ये प्रोमेथाझिन ओरल सोल्युशन, कोफॅक्समॅलिन बेबी कफ सिरप, मॅकॉफ बेबी कफ सिरप आणि मॅग्रिप एन कोल्ड सिरप आहेत.

वैद्यकीय प्रोडक्ट्सचा इशारा जारी करताना डब्ल्यूएचओने म्हटलंय की, 'चारही कफ सिरपच्या नमुन्यांच्या प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये डायथिलीन ग्लायकोल आणि इथिलीन ग्लायकोलची अयोग्य मात्रा आढळून आली आहे. हे प्रोडक्ट्स आतापर्यंत फक्त गाम्बियामध्येच आढळून आलीयेत. परंतु ती इतर देशांमध्येही वितरित केली जाण्याची शक्यता आहे. 

सध्या WHO कंपनी आणि नियामक प्राधिकरणांसोबत याची चौकशी करतंय. WHO ने जारी केलेल्या निवेदनात या उत्पादनांचा वापर असुरक्षित असल्याचे वर्णन केले आहे. विशेषत: ही औषधे लहान मुलांसाठी अत्यंत घातक ठरू शकतात. त्यामुळे असं कोणतेही औषध वापरू नका, असं आवाहनही WHO ने केलं आहे.