चेहरा प्रत्यारोपणानंतर आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या 'केटी'ला मिळाले जगण्याची नवी संधी

केटी स्टबलफील्ड ही 21 वर्षीय तरूणी 'नॅशनल जिओग्राफिक'च्या मुखपृष्ठावर झळकत आहे.

Dipali Nevarekar | Updated: Aug 20, 2018, 12:12 PM IST
चेहरा प्रत्यारोपणानंतर आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या 'केटी'ला मिळाले जगण्याची नवी संधी title=

अम्रेरिका : केटी स्टबलफील्ड ही 21 वर्षीय तरूणी 'नॅशनल जिओग्राफिक'च्या मुखपृष्ठावर झळकत आहे. केटीचे इंटरनेटवर व्हायरल होत असलेले फोटो पाहून तुम्हांला कदाचित तिच्यामध्ये काही दोष असल्याने चेहरा विद्रुप असल्याचं वाटलं असेल मात्र वास्तव फार वेगळं आहे. केटीने आत्महत्येच्या प्रयत्नांमध्ये तिचं सौंदर्य आणि अनेक अत्यावश्यक क्रियांवरील नियंत्रण गमावले होते. पण म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी? नियतीने केटीला जीवनदान दिलं आहे. 

कसा घडला केटीच्या आयुष्यात हा सारा प्रकार 

किशोरवयीन केटीने तिच्या आयुष्यातील संघर्षाच्या काळात हार मानून आत्महत्येचा प्रयत्न केला. या आत्महत्येमध्ये केटीच्या चेहर्‍याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. मात्र अमेरिकेत वेळीच मिळालेल्या उपचारांनंतर केटीचा जीव वाचावण्यात डॉक्टरांना यश मिळाले.  

चेहरा प्रत्यारोपणासाठी प्रतिक्षा 

डॉक्टरांनी केटीचा जीव वाचावला असला तरीही गोळी झाडून आत्महत्या केलेल्या केटीच्या चेहर्‍यावरील नाक, जबडा, त्वचेवरील अनेक पेशी, भुवयांचं नुकसान झालं होतं. चेहर्‍यावर प्रचंड प्रमाणात सूज होती. डॉक्टरांनी केटीचं आयुष्य पुन्हा सुसह्य करण्यासाठी चेहरा प्रत्यारोपणाचा मार्ग सुचवला होता. केटीच्या परिवाराला यासाठी तब्बल 3 वर्षांची प्रतिक्षा करावी लागली. 

31 तासांची शस्त्रक्रिया 

ड्रग्सच्या ओव्हर डोसमुळे मृत पावलेल्या एका स्त्रीमुळे केटीला पुन्हा चेहरा मिळाला. डॉक्टरांनी केटीच्या चेहरा प्रत्यारोपणाची प्रक्रिया सुरू केली. सुरूवातीला काही प्रमाणातच चेहर्‍याचं प्रत्यारोपण करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला होता. मात्र केटीचा पूर्ण चेहरा प्रत्यारोपण तिच्यासाठी अधिक फायद्याचं असल्याचं दिसल्यानंतर डॉक्टरांनी केटीचा पूर्ण चेहरा बदलण्यासाठी प्रयत्न सुरू केले. 

4 मे 2017 रोजी केटीवर चेहरा प्रत्यारोपणासाठी प्रक्रिया सुरू झाली. 11 तज्ञ डॉक्टरांच्या 31 तास  सतत सुरू असलेल्या शस्त्रक्रियेनंतर केटीची चेहरा प्रत्यारोपणाची प्रक्रिया पूर्ण झाली.  

शस्त्रक्रियेनंतर बदललं केटीचं आयुष्य 

आता चेहर्‍याला हात लावल्यानंतर छान वाटत असल्याचं केटीने सांगितलं आहे. अजूनही केटीला बोलताना त्रास होत असला तरीही पूर्वीपेक्षा तिचं आयुष्य खूपच सुसह्य झाले आहे. या शस्त्रक्रियेचा त्रास होऊ नये, रिअ‍ॅक्शन होऊ नये म्हणून आयुष्यभर केटीला औषधगोळ्यांचा आधार घ्यावा लागणार आहे. 

'आयुष्य सुंदर आणि अत्यंत मोलाचं आहे'. अशी भावना केटीने व्यक्त केली आहे. लवकरच केटी पुन्हा ऑनलाईनच्या माध्यमातून तिचं शिक्षण पूर्ण करणार आहे.  

 

नॅशनल जिओग्राफीच्या मुखपृष्ठावर   

सप्टेंबर महिन्याच्या 'नॅशनल जिओग्राफी'च्या मुखपृष्ठावर केटीचा फोटो झळकला आहे.  जगभरात नैराश्य आणि नैराश्यातून आत्महत्येचं प्रमाण वाढलं आहे. अशाच एका कठीण काळात केटने आत्महत्येचा निर्णय घेतला. मात्र आता नियतीनं तिला जीवनाचा आनंद घेण्याची दुसरी दुर्मीळ संधी दिली आहे. 

आत्महत्येच्या प्रयत्नानंतर विद्रुप झालेल्या चेहर्‍याला पुन्हा पूर्ण चेहरा प्रत्यारोपणाने जीवनदान मिळणारी केटी स्टबलफील्ड ही सगळ्यात लहान  अमेरिकन तरूणी आहे. 

आरोग्यशास्त्रात विज्ञानाच्या किमयेमुळे केटीला जीवनदान मिळालं आहे. याची दखल घेत नॅशनल जिओग्राफीने तिचा चेहरा मृखपृष्ठावर छापण्याचा निर्णय घेतला.