आता पुरुषही रोखू शकतात गर्भधारणा, ICMR ला मोठं यश; महिलांसाठी क्रांतिकारी बदल

इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) पुरुषांसाठीचं गर्भनिरोधक RISUG पूर्णपणे सुरक्षित आहे आणि त्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत असं सांगितलं आहे. पुरुषांची गर्भनिरोधक पद्धत काय आहे आणि ती कशी कामे करते याबद्दल जाणून घ्या.   

शिवराज यादव | Updated: Oct 19, 2023, 03:16 PM IST
आता पुरुषही रोखू शकतात गर्भधारणा, ICMR ला मोठं यश; महिलांसाठी क्रांतिकारी बदल title=

जगभरातील अनेक वैज्ञानिक, संस्था गेल्या काही वर्षांपासून पुरुषांसाठीच्या गर्भनविरोधकासंबंधी संशोधन करत आहे.  यादरम्यान इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (ICMR) हाती मोठं यश लागलं आहे. आयसीएमआर गेल्या सात वर्षांपासून पुरुषांच्या गर्भनिरोधकावर संशोधन करत आहे. आयसीएमआरने पुरुषांसाठीचं गर्भनिरोधक RISUG पूर्णपणे सुरक्षित आहे आणि त्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत असं सांगितलं आहे. रिसग हे एक नॉन-हार्मोनल इंजेक्टेबल (संप्रेरकं विरहित इंजेक्शन) गर्भनिरोधक आहे, जे गर्भधारणा रोखतं. 

रिपोर्टनुसार, या संशोधनात 303 पुरुष सहभागी झाले होते. पुरुषांसाठी हे एक यशस्वी गर्भनिरोधक आहे, जे दीर्घकाळासाठी गर्भधारणा रोखतं. 

रिसर्चमध्ये काय सांगितलं आहे?

इंटरनॅशनल ओपन अॅक्सेस जर्नल एंड्रोलॉजीमध्ये प्रसिद्ध कऱण्यात आलेल्या ओपन-लेबल और नॉन-रेंडमाइज्ड फेज-III अभ्यासातील निकषांनुसार, 25 ते 40 वर्षं वयोगटातील 303 निरोगी, सेक्शुअली सक्रीय आणि विवाहित तरुणांना यामध्ये सहभागी करुन घेण्यात आलं होतं. कुटुंब नियोजन रुग्णालयांच्या माध्यमातून निवड करत त्यांना यात सहभागी केलं होतं. यांना 60 मिलीग्रॅम रिसग देण्यात आलं होतं. 

संशोधनात रिसग गर्भधारणा रोखण्यात 99.02 टक्के यशस्वी झाल्याचं समोर आलं. विशेष म्हणजे, याचे कोणतेही दुष्परिणाम जाणवले नाहीत. रिसगने 97.3 टक्के % एजोस्पर्मिया गाठला, जो एक वैद्यकीय शब्द आहे जो सूचित करतो की स्खलित वीर्यमध्ये शुक्राणू नसतात. रिसर्चमध्ये जे तरुण सहभागी झाले होते, त्यांच्या पत्नींचीही वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यावेळी त्यांच्यावर काही परिणाम झाला नसल्याचं स्पष्ट झालं. 

2022 मध्ये आयसीएमआरमधून निवृत्त झालेले आणि या संशोधनासाठी 20 वर्षांहून अधिक काळ देणारे डॉक्टर आरएस शर्मा यांचं म्हणणं आहे की, "आम्ही या रिसर्चच्या माध्यमातून रिसगसंबंधी दोन मुख्य चिंता दूर करण्यात यशस्वी झालो आहोत. एक म्हणजे गर्भनिरोधक किती काळासाठी प्रभावी राहणार आणि गर्भनिरोधक घेणाऱ्यांसाठी ते किती सुरक्षित आहे".

आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात आलेल्या अभ्यासात रिसगचं इंजेक्शन घेतल्यानंतर काहींना ताप, सूज आणि संसर्ग असे काही दुष्परिणाम जाणवले होते. पण काही आठवड्यांपासून ते तीन महिन्यात त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. 

रिसग कसं काम करतं?

रिसग दोन शुक्राणूंच्या नलिकांमध्ये (व्हॅस डेफेरेन्स) इंजेक्शनने दिले जाते जे शुक्राणूंना अंडकोषातून प्रायव्हेट पार्टमध्ये घेऊन जातात. सर्व प्रथम, भूलदिली जाते. नंतर रिसगला अनुक्रमे पहिल्या आणि नंतर दुसऱ्या शुक्राणू वाहिनीमध्ये टाकलं जाते.

एकदा इंजेक्ट केल्यावर, पॉलिमर शुक्राणू वाहिनीच्या भिंतींना चिकटून राहतो. जेव्हा पॉलिमर शुक्राणू नकारात्मक चार्ज केलेल्या शुक्राणूंच्या संपर्कात येतात, तेव्हा ते त्यांचा विनाश करतात ज्यामुळे त्यांचा विकास होत नाही. 

महिलांसाठी क्रांतिकारी बदल

शारिरीक संबंध ठेवताना गर्भधारणा होऊ नये यासाठी पुरुष नेहमी कंडोमचा वापर करतात. पण त्याव्यतिरिक्त पुरुषांकडे इतर कोणताही पर्याय नव्हता. गर्भधारणा रोखण्यासाठी महिला ज्या गर्भनिरोधक गोळ्या घेतात त्याचे आरोग्यावर परिणाम होतात. महिलांच्या हार्मोन्सचं तोल बिघडतो. पण मेल बर्थ कंट्रोल आल्याने महिलांचं आरोग्य आणि आयुष्यावर सकारात्मक परिणाम होतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.