चौथ्या लाटेचे संकेत असताना केंद्र सरकाकडून गंभीर इशारा

केंद्र सरकारने सोमवारी कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंटबाबत महत्त्वाची माहिती देत गंभीर इशारा दिला आहे.

Updated: Mar 22, 2022, 02:12 PM IST
चौथ्या लाटेचे संकेत असताना केंद्र सरकाकडून गंभीर इशारा title=

दिल्ली : जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाची प्रकरणं वाढताना दिसतायत. अशातच केंद्र सरकारने सोमवारी कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंटबाबत महत्त्वाची माहिती देत गंभीर इशारा दिला आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंट अजून भारतातून गेला नाहीये, असं सरकारकडून सांगण्यात आलंय. दरम्यान केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, जगातील एकूण कोरोना मॅनेजमेंटपेक्षा भारताने केलेले प्रयत्न 23 पटीने चांगले होते. 

आरोग्य मंत्रालयाचे जॉईंट सेक्रेटरी लव अग्रवाल यांनी सांगितलं की, आज, भारताने जगातील इतर देशांच्या तुलनेत ओमायक्रॉन व्हेरिएंटचा प्रसार खूप चांगल्या पद्धतीने रोखला आहे. आज जगभरात 15-17 कोरोनाची प्रकरणं समोर आली आहेत. तर भारतात दररोज कोरोनाच्या प्रकरणांचा आकडा 3000 पेक्षा कमी नोंदवला जातो.

लव अग्रवाल पुढे म्हणाले, "आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी प्रत्येक घरा-घरात जाऊन लस घेतली की नाही याबाबत विचारणा केली. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या याच प्रयत्नांमुळे देशाला समर्थन मिळण्यास मदत झाली. आम्ही जगभरातील 99 देशांमध्ये ही लस उपलब्ध करून दिली आहे. भारतात 145 दिवसांत 25 कोटी डोस देण्यात आलेत."

"भारतात 180 कोटींहून अधिक कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले आहेत. भारतात दिलेले हे डोस अमेरिकेपेक्षा 3.2 पट अधिक आणि फ्रान्सपेक्षा 12.5 पट जास्त आहे. भारतातील 81 कोटींहून अधिक लोकांना लसीचे पूर्ण डोस मिळालेले आहेत," अशी माहितीही अग्रवाल यांनी दिली आहे.