मुंंबईत लेप्टोचा पहिला बळी, या साथीच्या आजारापासून बचावण्यासाठी खास टीप्स

पावसाळा सुरू झाल्यानंतर वातावरणात अल्हाददायक गारवा निर्माण होतो. पण यासोबतीनेच अनेक साथीच्या आजारही डोक वर काढतात.  

Updated: Jun 27, 2018, 08:32 AM IST
मुंंबईत लेप्टोचा पहिला बळी, या साथीच्या आजारापासून बचावण्यासाठी खास टीप्स title=
प्रातिनिधिक फ़ोटो

मुंबई : पावसाळा सुरू झाल्यानंतर वातावरणात अल्हाददायक गारवा निर्माण होतो. पण यासोबतीनेच अनेक साथीच्या आजारही डोक वर काढतात.  लेप्टोस्पायरोसिसने मुंबईत पहिला बळी घेतला आहे. लेप्टोस्पायरोसिसच्या प्रादूर्भावाने १५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. चिखलात फुटबॉल खेळल्यामुळे त्याला लेप्टोची लागण झाली. सायन रूग्णालयात उपचार सुरू असताना अखेर त्याचा मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूनंतर मनपाच्या आरोग्य विभागाकडून संबंधित परिसराची पाहणी करण्यात येत आहे.

कशामुळे होतो लेप्टोस्पायरोसिस ?

लेप्टोचा संसर्ग पावसाळ्यातील साठलेल्या सांडपाण्याने होतो. 
संसर्ग झालेल्या प्राण्यांचे मूत्र पावसाळ्यात साठलेल्या पाण्यात मिसळले असेल आणि उघड्या जखमांशी अशा पाण्याचा संबंध आला तर संसर्ग होऊ शकतो.
उंदीर, कुत्रा या प्राण्यांच्या मूत्रापासून संसर्ग होण्याचा संभव अधिक 
संसर्ग रोखण्यासाठी पावसाळ्यात साठलेल्या पाण्यातून चालणं टाळा. 
साठलेल्या पाण्यातून जावेच लागले तर, गमबूट घालून जावे,  उघड्या जखमांशी पाण्याचा संबंध येणार नाही याची काळजी घ्यावी...

लेप्टोस्पायरोसिसची लक्षणं 

अचानक तीव्र ताप,  
डोकेदुखी
अंगदुखी
पोटदुखी
थंडी वाजणे

या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर स्वरूप धारण करण्याची शक्यता असते. त्यावेळेस अंगावर लाल चट्टे उमटणे, उलट्या होणं अशी लक्षण समोर येतात.

काय  काळजी घ्याल ?  

साचलेल्या पाण्यातून चालून घरी पोहोचल्यानंतर स्वच्छ पाण्याने पाय व चपला धुवाव्यात. विशेषत: मधुमेहीनी पायाची बोटे स्वच्छ धुवावीत.

साचलेल्या पाण्यात जास्त वेळ  उभे राहू नका. कारण यामुळे जंतूसंसर्ग होऊ शकतो.

पावसाळ्यात मोकळ्या व स्वच्छ धुता येण्याजोग्या चपला वापराव्यात. यामुळे त्यात पाणी साचून राहणार नाही व धुतल्यानंतर ते लवकर सुकतील. तुम्ही स्वच्छ धुतलेल्या चपला घालून साचलेल्या पाण्यात गेलात तरी चपला पुन्हा धुणे आवश्यक आहे.

जखम झालेली असल्यास त्यावरील पट्टी दररोज बदलावी आणि शक्य असेल तेव्हा जखम उघडी ठेऊन सुकवावी. जखमेवरील पट्टी भिजल्यास त्वरीत पट्टी काढावी. पट्टी बदलण्यापूर्वी जखम व्यवस्थित धुवून त्यावर योग्य ते अँटिसेप्टिक मलम लावून पट्टी पुन्हा बांधावी.

चेहरा, तोंड व नाक हाताने पुसण्याऐवजी हातरुमाल किंवा टिशूपेपरचा वापर करावा. यामुळे चेहरा, नाक व तोडांला होणारा जंतूसंसर्ग टाळता येईल.

पावसाळ्यात नखे नियमित कापून स्वच्छ ठेवावीत. लांब नखांमध्ये घाण साचल्याने जंतूसंसर्ग होण्याचा धोका असतो. त्यामुळे संसर्गजन्य रोगांपासून बचाव होण्यासाठी नखे कापलेली व स्वच्छ ठेवावीत.