वायू प्रदूषण कमी करतंय तुमचं 9 वर्षांचं आयुष्य! तर भारतात येथे हवा विषारी

भारतातील प्रदूषणाचा धोका सातत्याने वाढताना दिसतोय.

Updated: Sep 9, 2021, 03:30 PM IST
वायू प्रदूषण कमी करतंय तुमचं 9 वर्षांचं आयुष्य! तर भारतात येथे हवा विषारी title=

मुंबई : भारतातील प्रदूषणाचा धोका सातत्याने वाढताना दिसतोय. वाढत्या प्रदूषणामुळे देशातील लोकांचं वय कमी होऊ लागले आहे. शिकागो विद्यापीठाच्या एनर्जी पॉलिसी संस्थेने भारताच्या वायू प्रदूषणावर एक संशोधन केलं. या संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की, प्रदूषणामुळे भारतातील 40 टक्के लोकांचं सरासरी आयुष्य 9 वर्षांनी कमी होऊ शकतं. म्हणजेच, जर एखादी व्यक्ती 80 वर्षांपर्यंत जगली तर भारताच्या वायू प्रदूषणामुळे त्याचे वय 71 वर्षे होईल.

उत्तर भारताची हवा 10 पट अधिक विषारी 

या अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की, उत्तर भारतातील 48 कोटी लोकांना दररोज धोकादायक वायू प्रदूषणाचा सामना करावा लागतो. उत्तर भारतातील लोक ज्या हवेमध्ये श्वास घेतात ती जगातील इतर कोणत्याही ठिकाणापेक्षा 10 पट अधिक विषारी आहे. 

मध्य आणि पश्चिम भारतातील लोकांची स्थितीही फारशी चांगली नाही. 2000 पासून महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सारख्या राज्यांमध्ये हवेची गुणवत्ताही खालावली आहे. इथली लोकंही वायू प्रदूषणामुळे पूर्वीपेक्षा 2 ते 3 वर्षे कमी जगत आहेत.

या अहवालात असंही सुचवण्यात आलं आहे की, जर भारत सरकारने Clean Air Policy आणली तर भारतातील लोकांचं सरासरी वय 5 वर्षांनी वाढू शकतं. जर केवळ दिल्लीतील वायू प्रदूषणाची पातळी जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मार्गदर्शक तत्त्वांनुसार झाली तर दिल्लीच्या लोकांना आणखी जगण्यासाठी 10 वर्षे मिळतील.

2019मध्ये भारतात प्रदूषणामुळे 16 लाख मृत्यू

यानुसार, 2019 मध्ये जगातील 92 लाख लोकांचा वायू प्रदूषणामुळे मृत्यू झाला. यापैकी 16 लाखांहून अधिक मृत्यू केवळ भारतात झाले. वायू प्रदूषण मूल्यांकन संस्था IQ Airने नुकतीच जगातील सर्वाधिक प्रदूषित देशांची यादी जाहीर केली. यामध्ये भारत तिसरा सर्वाधिक प्रदूषित देश आहे. या यादीत बांगलादेश पहिल्या क्रमांकावर आणि पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकावर आहे.