चिंताजनक! 30 दिवसांत 10 पैकी 8 घरांमध्ये पोहोचला Corona

एका ऑनलाइन प्लॅटफॉर्मने केलेल्या सर्वेक्षणातून ही गंभीर माहिती समोर आली आहे.

Updated: Aug 19, 2022, 07:39 AM IST
चिंताजनक! 30 दिवसांत 10 पैकी 8 घरांमध्ये पोहोचला Corona title=

दिल्ली : दिल्लीत नॅशनल कॅपिटल रिजन (NCR) मध्ये, गेल्या 30 दिवसांत दहापैकी आठ घरांमध्ये एक किंवा अधिक लोकांमध्ये व्हायरसच्या तापाची लक्षणं दिसून आली. एका ऑनलाइन प्लॅटफॉर्मने केलेल्या सर्वेक्षणातून ही गंभीर माहिती समोर आली आहे. 

या सर्वेक्षणात दिल्ली, गुरुग्राम, गाझियाबाद, नोएडा आणि फरीदाबाद इथल्या 11 हजारांहून अधिक रहिवाशांनी त्यांचा अभिप्राय दिला होता.

सर्वेक्षणातील सहभागींमध्ये 63 टक्के पुरुष आणि 37 टक्के महिला होत्या. 'लोकल सर्कल'ने केलेल्या सर्वेक्षणानुसार, 54 टक्के लोकांनी सांगितलं की, गेल्या 30 दिवसांत त्यांच्या कुटुंबातील किमान दोन सदस्यांना ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी, अंगदुखी आणि इतर लक्षणं दिसून आली आहेत.

इतकंच नाही तर 23 टक्के लोकांच्या म्हणण्याप्रमाणे, त्यांच्या कुटुंबातील चार किंवा अधिक सदस्यांना व्हायरल तापाची लक्षणं आहेत. या आकडेवारीच्या तुलनेत गेल्या वर्षी याच कालावधीत केवळ 42 टक्के कुटुंबांमध्ये विषाणूजन्य तापाची एक किंवा अधिक लक्षणं आढळून आलीयेत.

ऑनलाइन प्लॅटफॉर्मने असंही म्हटलंय की, बहुतेक प्रकरणांमध्ये लोकांना कोविड किंवा व्हायरल तापाची चाचणी करण्यासाठी घरी किट ऑर्डर करणं योग्य वाटलं. गेल्या दोन आठवड्यांपासून दिल्लीत कोविड-19 संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ झालीये.

दिल्लीत आरोग्य विभागाने गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,964 नवीन रुग्ण आढळले आहेत. या कालावधीत 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मात्र, बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1,939 झाली आहे. तर दिल्लीत कोरोनाचे एकूण एक्टिव्ह रुग्ण 6,826 आहेत. कोरोनाचा पॉझिटीव्हिटी रेट 9.42% आहे.

बुधवारीही 1600 हून अधिक कोरोनाच्या नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य विभागाने बुधवारी माहिती दिली की, गेल्या 24 तासांत दिल्लीत कोरोनाचे 1652 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 8 जणांचा मृत्यू झाला आहे. Omicron चे BA.4 आणि BA.5 सब-व्हेरिएंट राजधानीत सक्रिय झाल्यानंतर प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ झालीये.