२० वर्षाच्या तरुणाची कमाल; बटाट्यापासून बनवलं विघटनशील प्लास्टिक

१०० टक्के विघटनशील प्लास्टिक असल्याचं बोललं जात आहे.

Updated: Oct 20, 2019, 02:04 PM IST
२० वर्षाच्या तरुणाची कमाल; बटाट्यापासून बनवलं विघटनशील प्लास्टिक title=

चंदीगढ : चंदीगढमधील चितकारा यूनिव्हर्सिटीचा २० वर्षीय विद्यार्थी प्रनव गोयलने बटाट्यामध्ये असलेल्या स्टार्चपासून प्लास्टिकसारखी एक नवीन विघटनशील (डिग्रेडेबल) वस्तू बनवली आहे. ही वस्तू प्लास्टिकप्रमाणेच पारदर्शी आहे. दिसण्यामध्ये आणि हात लावल्यावरही ही वस्तू प्लास्टिकसारखीच भासते. याला सहजपणे मोल्डही केलं जाऊ शकतं. 

प्रनवने बटाट्यामध्ये असणाऱ्या स्टार्चपासून एक प्रकारचं थर्मोप्लास्टिक बनवलं आहे. जे सध्या उपयोगात असलेल्या प्लास्टिकशी मिळतं-जुळतं आहे. पण याचा पर्यावरणाला कोणताही धोका नसल्याचं सांगितलं आहे.

या विघटनशील प्लास्टिकपासून बाटल्या, पिशव्या यांसारखी कोणतीही प्लास्टिकची वस्तू बनवली जाऊ शकते. या वस्तूमुळे पर्यावरणाला कोणतंही नुकसान होणार नाही. हे पर्यावरणात पूर्णपणे १०० टक्के विघटनशील आहे. जर सध्याच्या प्लास्टिकच्या जागी बाजारात या वस्तूचा वापर केल्यास, पर्यावरणाला होत असलेल्या मोठ्या नुकसानापासून वाचवता येईल असं प्रनवने सांगितलं आहे.

भारतात बटाट्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं आणि त्याची योग्यप्रकारे देखभाल न झाल्यामुळे अनेकदा उत्पादन खराबही होतं. विघटनशील प्लास्टिक बनवण्यासाठी या खराब झालेल्या बटाट्याच्या स्टार्चचा वापर केला जाऊ शकतो. 

प्रनवच्या टीमच्या सदस्य सलोनी यांनी झी मीडियाशी बोलताना सांगितलं की, आम्ही बनवलेली वस्तू पॉलिथिन आणि पॉलिप्रोपलीनप्रमाणेच आहे. आम्ही बनवलेलं थर्मोप्लास्टिक आहे. बटाट्यामध्ये १८ टक्के स्टार्च असल्याचं त्यांनी सांगितलं.

चितकारा यूनिव्हर्सिटीमधील आभा शर्मा यांनी सांगितलं की, आमचा उद्देश तरुण विद्यार्थ्यांना स्टार्टअपसाठी प्लॅटफॉर्म देणं हा आहे. २०२० पर्यंत आम्ही हे प्रोडक्ट बाजारात आणणार आहोत. यासाठी आम्हाला आतापासूनच अनेक ऑर्डर मिळाल्या आहेत. आम्ही प्रथम सर्वात मोठे केंद्र असणाऱ्या अन्न आणि पेय उद्योगावर लक्ष केंद्रित करणार आहे. या विघटनशील प्लास्टिकपासून जेवण पॅक केलं जाऊ शकतं. खाद्यपदार्थानंतर आम्ही इतर उद्योगांना याचा सप्लाय करणार आहे. या नव्या विघटनशील प्लास्टिकमुळे बाजारात अनेकांना नोकरीच्या संधीहीदेखील उपलब्ध होऊ शकत असल्याचं त्या म्हणाल्या.