धक्कादायक! कोरोनाग्रस्त रुग्णामुळे २८९ प्रवाशांना विमानातून उतरवलं आणि...

विमानाचं उड्डाण होण्य़ाच्या काही मिनिटं आधीच घडली ही घटना   

Updated: Mar 15, 2020, 01:50 PM IST
धक्कादायक! कोरोनाग्रस्त रुग्णामुळे २८९ प्रवाशांना विमानातून उतरवलं आणि...  title=
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : एका Corona कोरोनाग्रस्त रुग्णामुळे रविवारी कोची येथून दुबईच्या दिशेने जाणाऱ्या विमानाचं उड्डाण अचानकपणे रोखण्यात आलं. २८९ प्रावासी असणाऱ्या या विमानात युकेच्या एका कोरोनाग्रस्त प्रवाशाने प्रवेश केल्यामुळे तातडीने हे उड्डाणापूर्वीच काही क्षण आधी हे विमान थांबवण्यात आलं आणि प्रवाशांना त्यातून उतरवण्यात आलं. 

कोची आंतरराष्ट्रीय विमातळावरील प्रवक्त्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार १९जणांच्या एका समुहाचा भाग असणारा हा व्यक्ती केरळमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत होता. शिवाय त्याला अलगीकरणातही ठेवण्यात आलं होतं. पण, अधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारची सूचना न देता कोची विमानतळावर पोहोचणाऱ्या गटात तो सहभागी झाला. 

संबंधित व्यक्तीच्या चाचण्यांचा अहवाल आला तेव्हाच तो व्यक्ती कोची येथील विमानतळावर असून एमिरट्सच्या विमानाने प्रवास करणार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. ज्यानंतर त्या व्यक्तीसह १९जणांना विमानातून उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला. नंतर या विमानातील उर्वरित २७०जणांनाही उतरवून त्यांना तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं. 

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता बऱ्याच ठिकाणी सतर्कता पाळली जात आहे. सध्याच्या घडीला भारतामध्ये कोरोनाची दहशत अधिक फैलावत असून, महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक म्हणजे ३१ रुग्ण आढळले आहेत. त्यामागोमाग केरळमध्ये कोरोनाचे २२ रुग्ण आढळले. (ज्यामध्ये तिघांना रुग्णालयातून सोडण्यात आलं.) 

वाचा : ...म्हणून सैन्यदल वाहनांच्या चाकांना लावली जाते साखळी

शनिवारी केरळमध्ये एकूण १०६ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मुख्य म्हणजे केरळमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता निरिक्षणाखाली असणाऱ्या सर्व कुटुंबांना खाद्यपदार्थांचा पुरवठा घरपोच केला जात आहे. मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी दिलेल्या माहितीनुसार केरळमध्ये रेल्वेने प्रवास करणाऱ्यांचीही तपासणी केली जात आहे. एकंदरच कोरोनाशी लढण्य़ासाठी केरळ प्रशासनाकडून शक्य त्या सर्व परिंनी सावधगिरी बाळगली जात आहे.