भाजपावर दबाव , २०१९ आधी होणार ४ जागांवर पोटनिवडणूक

. विरोधक असेच एकत्र राहिले तर २०१९ ची निवडणूक भाजपाला भारी पडू शकते

Updated: Jun 2, 2018, 07:16 AM IST
भाजपावर दबाव , २०१९ आधी होणार ४ जागांवर पोटनिवडणूक title=

नवी दिल्ली : पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकांआधीच झालेल्या पोटनिवडणुकीतील १४ जागांवर विरोधकांनी एकत्र येत भाजपाला जोरदार टक्कर दिली. विरोधक असेच एकत्र राहिले तर २०१९ ची निवडणुक भाजपाला भारी पडू शकते हे गुरूवारी देशभरातील आलेल्या निकालातून स्पष्ट झालंय. भाजपाला उत्तर प्रदेशच्या कैराणा आणि महाराष्ट्राच्या भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. पालघर पोटनिवडणुकीत भाजपाला विजय मिळाला असला तरीही १० विधानसभा जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत केवळ एका जागेवरच विजय नशिबात आला. 

भाजपासमोर आव्हान 

२०१९ आधी ४ लोकसभा जागांवर पोटनिवडणुका होणार आहेत. यामध्ये कर्नाटकच्या ३ आणि जम्मू काश्मीरच्या एका जागेचा समावेश आहे. कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीनंतर बीएस येडियुरप्पा आणि बी. श्रीरामुलु यांनी लोकसभेचा राजीनामा दिला. येडियुरप्पा शिमोगा येथून तर श्रीरामुलु हे बेल्लारी येथील खासदार होते. खासदार सीएस पुट्टाराजू मांड्या यांनी लोकसभा  जागेचा राजीनामा दिला होता. आता या जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकीतही विरोधी पक्ष मजबुत झाल्याने भाजपावर दबाव वाढलाय.