म्हैसूर राजघराण्यात ४०० वर्षानंतर मुलाचा जन्म

त्रिशिका यांच्या पोटी जन्मलेल्या बाळामुळे राजघराण्याच्या आनंदाला उधाण आलं आहे. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 7, 2017, 10:45 PM IST
म्हैसूर राजघराण्यात ४०० वर्षानंतर मुलाचा जन्म

म्हैसूर : म्हैसूर राजघराण्यात कधीही मुलाचा जन्म होणार नाही आणि हा राजवंश नष्ट होईल, असा शाप या घराण्याला मिळाल्याची अख्यायिका आहे. म्हणूनच त्रिशिका यांच्या पोटी जन्मलेल्या बाळामुळे राजघराण्याच्या आनंदाला उधाण आलं आहे. 

शापातून मुक्तता झाली अशी चर्चा

म्हैसूरच्या वाडियार राजघराण्याची शापातून मुक्तता झाली अशी चर्चा लोकांमध्ये आहे, कारण तब्बल ४०० वर्षांनंतर राजा यदुवीर आणि त्रिशिका यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे. आता चिमुकल्याच्या आगमनानं हे घराणं शापमुक्त झालं म्हणूनच म्हैसूरच्या महालात आनंदोत्सव सुरू आहे.

या दोघांचा विवाह जूनमध्ये पार पडला

राजा यदुवीर कृष्णदत्त चामराजा वाडियार यांचा विवाह गेल्यावर्षी राजस्थानमधील डूंगपुरच्या राजकुमारी त्रिशिकासोबत पार पडला.  यदुवीर यांनी बोस्टनमध्ये शिक्षण पूर्ण केले आहे. त्रिशिका यांनीही अमेरिकेतून उच्चशिक्षण घेतले आहे. ऐतिहासिक आंबा विला पॅलेसमध्ये या दोघांचा विवाह जूनमध्ये पार पडला.

राजघराण्याचा वारस दत्तक घेण्याची परंपरा

राजा यदुवीर कृष्णदत्त चामराजा वाडियार यांनाही दत्तक घेण्यात आलं होतं. राणी प्रमोदा आणि राजा श्रीकांतदत्ता यांनी काही वर्षांपूर्वी यदुवीर यांना दत्तक घेतलं. त्यांनाही संतती नाही. 

म्हैसूर राजवाड्यात आनंदाचं वातावरणं 

वाडियार राजघराण्याला राजपुत्र लाभल्यानं म्हैसूर राजवाड्यात आनंदाचं वातावरणं आहे. अशी अख्यायिका आहे की, विजयनगर साम्राज्याचं पतन झाल्यानंतर म्हैसूर राजघराण्याच्या सैनिकांनी विजयनगर साम्राज्याचा खजिना लुटला.  १६१२ मध्ये विजयनगर साम्राज्याचं पतन झाल्यानंतर, अलमेलम्मा यांनी या घराण्याला शाप दिला होता. 

दु:खी झालेल्या राणी अलमेलम्मा यांनी शाप दिला

तसेच राणी अलमेलम्माजवळ शाही घराण्याचे दागदागिने शिल्लक होते. जेव्हा वाडियार राजांनी ते दागिने वाडियार घराण्याला देण्याचा आदेश राणीला दिला तेव्हा त्यांनी नकार दिला. त्यावेळी बळजबरीनं शाही सैन्यानं राणीकडून दागिने घेण्याच्या प्रयत्न केला. या प्रकारातून दु:खी झालेल्या राणी अलमेलम्मा यांनी शाप दिला. 

शापानंतर राजघराण्यात मुलाचा जन्म झाला नाही

जसं विजयनगर साम्राज्याचा अंत झाला तसंच वाडियार राजघराणंही नष्ट होईल, असा तो शाप होता. त्यानंतर राणीने आत्महत्या केली होती. या शापानंतर राजघराण्यात मुलाचा जन्म झाला नाही. आपल्या घराण्याचा वारस दत्तक घेण्याची प्रथा या घराण्यात रुढ झाली होती.

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close