35 वर्षीय पत्नीचा काटा काढण्यासाठी 71 वर्षीय पतीने दिली सुपारी; घरात दिव्यांग मुलगा असतानाच हल्लेखोर घुसले अन्...

Crime News: पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता महिला मृतावस्थेत पडली होती. महिलेच्या शरिरावर भोसकल्याच्या जखमा होत्या. पोलिसांनी याप्रकरणी आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.   

शिवराज यादव | Updated: May 18, 2023, 01:12 PM IST
35 वर्षीय पत्नीचा काटा काढण्यासाठी 71 वर्षीय पतीने दिली सुपारी; घरात दिव्यांग मुलगा असतानाच हल्लेखोर घुसले अन्... title=

Delhi Murder News: राजधानी दिल्लीत (Delhi) पतीनेच सुपारी देत पत्नीची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पश्चिम दिल्लीच्या राजौरी गार्डन परिसरात दुपारी 2.30 वाजता ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 71 वर्षीय पतीने आपल्या 35 वर्षीय पत्नीची हत्या करण्यासाठी दोन कॉन्ट्रॅक्ट किलर्सना सुपारी दिली होती. यानंतर त्यांनी चाकूने भोसकून महिलेची हत्या केली. 

पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता महिला मृतावस्थेत पडली होती. महिलेच्या शरिरावर भोसकल्याच्या जखमा होत्या. पोलिसांनी तपास केला असता, पीडित महिला नोव्हेंबर महिन्यात एस के गुप्ता यांच्याशी विवाहबंधनात अडकली होती अशी माहिती मिळाली आहे. 

तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की, एस के गुप्ता यांचा मुलगा अमित दिव्यांग आहे. यासह त्याला सेरेब्रल पाल्सीचाही त्रास आहे. आपण लग्न केलं तर पत्नी आपल्या मुलाची काळजी घेईल असं त्यांना वाटलं होतं. पण लग्नानंतर त्यांच्या या अपेक्षा फोल ठरल्या. यामुळे गुप्ता यांनी पत्नीला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. पण पत्नीने घटस्फोट देण्यासाठी 1 कोटींची मागणी केली. 

यानंतर मात्र एस के गुप्ता यांचा संताप झाला होता. त्यांना कोणत्याही स्थितीत पत्नीपासून सुटका करुन घ्यायची होती. तिने केलेल्या कोणत्याही मागण्या पूर्ण करण्याची त्यांची इच्छा नव्हती. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एस के गुप्ता आरोपी विपीन याच्या संपर्कात आले होते. विपीन त्यांच्या मुलाला नेहमी रुग्णालयात नेण्याचं काम करत असे. यावेळी त्यांनी आपला मुलगा आणि विपीन यांच्यासह मिळून त्यांच्या पत्नीची हत्या करण्याचा कट आखला. त्यांनी यासाठी विपीनला 10 लाख रुपये देण्याचं आश्वासन दिलं. अॅडव्हान्स म्हणून त्यांनी त्याला 2 लाख 40 हजार रुपयेही दिले होते. 

ठरल्यानुसार, आरोपी विपीन आणि त्याचा सहकारी हिमांशू गुप्ता यांच्या घऱी गेले. यानंतर त्यांनी महिलेची धारदार शस्त्राने भोसकून हत्या केली. यादरम्यान आरोपीदेखील जखमी झाले. यावेळी त्यांनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी घराची तोडफोड केली. तसंच ही चोरी वाटावी यासाठी पीडित महिला आणि अमित या दोघांचे मोबाइल सोबत नेले अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

हत्या झाली तेव्हा अमित घरातच होता असं अधिकाऱ्याने सांगितलं आहे. तपासाच्या आधारे. पोलिसांनी एस के गुप्ता, त्यांचा मुलगा अमित आणि सुपारे घेणारे विपीन सेठी आणि हिंमांशू यांना अटक केली आहे. त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलीस सध्या मोबाइल फोन, रक्ताने माखलेले कपडे आणि गुन्ह्यात वापरलेली स्कूटर मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.