Crime News: मोलकरणीला नग्न करुन गुप्तांगावर मारहाण; घटना ऐकून तुमचीही तळपायातील आग मस्तकात जाईल

Domestic Help Tortured Case: अल्पवयीन मोलकरणीला सलग पाच महिने मारहाण तसंच लैंगिक छळ करण्यात आल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर देशभरातून संताप व्यक्त होत आहे. काठ्या, ब्लेड आणि गरम चिमट्यांनी मुलीवर अत्याचार करण्यात आले. इतकंच नाही तर कपडे काढून गुप्तांगावर मारहाण करण्यात आली.   

Updated: Feb 10, 2023, 11:52 AM IST
Crime News: मोलकरणीला नग्न करुन गुप्तांगावर मारहाण; घटना ऐकून तुमचीही तळपायातील आग मस्तकात जाईल title=

Domestic Help Tortured Case: दांपत्याने अल्पवयीन मोलकरणीला (Domestic Help) मारहाण करत लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुग्राममधील (Gurugram) ही घटना समोर आल्यानंतर संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. मनिष कौर आणि कमलजीत कौर (Manish Kaur Kamaljit Kaur) अशी या आरोपी दांपत्याची नावं आहेत. सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवल्यानंतर या मुलीची सुटका करण्यात आली आहे. सलग पाच महिने मुलीवर अत्याचार करण्यात आले असून तिला काठ्या, ब्लेड आणि गरम चिमट्यांनी मारहाण करण्यात आली. ही घटना उघडकीस आल्यानंतर दांपत्याला संबंधित कंपन्यांनी कामावरुन काढून टाकलं आहे. 

PTI च्या वृत्तानुसार, आरोपी पती एका इन्शुरन्स कंपनीत कामाला असून, पत्नी एका पीआर कंपनीत कामाला होती. खासगी कंपनीत काम करणाऱ्या या दांपत्याने अल्पवयीन मोलकरणीला जनावरासारखी वागणूक दिली. या घटनेनंतर संताप व्यक्त होत असताना कंपन्यांनीही त्यांना कामावरुन काढून टाकलं आहे. 

कमलजीत कौरला नोकरीवरुन काढून टाकल्यानंतर कंपनीने म्हटलं आहे की "कमलजीत कौर यांच्यावरील मानवी हक्क आणि बाल शोषणाच्या आरोपांबद्दल ऐकून धक्का बसला आहे. एक संस्था म्हणून, आम्ही भारतीय कायद्याचा आदर करतो आणि कोणत्याही प्रकारच्या मानवी हक्कांच्या गैरवापराच्या विरोधात आहोत. कंपनीने तात्काळ स्वरुपात त्यांना कामावरुन काढून टाकलं आहे". मनिष कौर याच्या कंपनीनेही ट्वीट करत कारवाई करण्यात आली असल्याची माहिती दिली. 

दरम्यान, ही तरुणी ज्या प्लेसमेंट एजन्सीमार्फत काम करत होती, तिचा पोलीस शोध घेत आहेत. 

मुलीला नग्न करुन मारहाण

पीडित तरुणी झारखंडच्या रांचीमधील आहे. एका प्लेसमेंट एनज्सीच्या मार्फत तिला कामावर ठेवण्यात आलं होतं. दांपत्य रोज तिला जनावराप्रमाणे मारहाण करत होतं असा उल्लेख तक्रारीत आहे. मंगळवारी पोलीस आणि सखी यांच्या संयुक्त पथकाने मुलीची सुटका केली. सखी सेंटरच्या इन-चार्ज पिंकी मलिक यांनी याप्रकरणी तक्रार दिली. 

एफआयआरमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, मुलगी 17 वर्षांची आहे. मनिष कौर तिला नग्न करुन तिच्या गुप्तांगातवर मारत असे. तसंच तिला घऱात डांबून ठेवण्यात आलं होतं. तिला तिच्या कुटुंबीयांशी बोलू दिलं जात नव्हतं. 
 
सामाजिक कार्यकर्त्या दीपिका नारायण भारद्वाज यांनी सोमवारी ट्वीट करत मुलीची सुटका करण्यासाठी मदत मागितली होती. तिच्या संपूर्ण शरिरावर जखमा असून गेल्या पाच महिन्यात प्रत्येक दिवशी तिला मारहाण झाल्याचं त्यांनी सांगितलं होतं. तसंच ती दयनीय अवस्थेत असून, एक रुपयाही देण्यात आला नसल्याचं म्हटलं होतं. 

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनीही या घटनेची दखल घेत हरियाणाचे मुख्यमंत्री आणि बालहक्का संरक्षण राष्ट्रीय आयोगाकडे मुलीच्या पुनर्वसनासाठी मदत मागितली होती.