Lockdown : अवघ्या एका रुपयात 'या' अम्मा विकतात इडली

कोणीही उपाशी राहू नये म्हणून... 

Updated: May 10, 2020, 10:52 AM IST
Lockdown : अवघ्या एका रुपयात 'या' अम्मा विकतात इडली  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

कोईंबतूर : Coronavirus कोरोना विषाणूची लाट साऱ्या जगाला एका संकटाच्या टप्प्यावर घेऊन आलेली आहे. भल्याभल्यांना बेजार करणाऱ्या विषाणूची लागण होणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. तर, मृतांचा आकडाही चिंतेचा विषय. मुख्य म्हणजे विषाणूचा संसर्ग न झालेल्या वर्गालाही या साऱ्याची झळ सोसावी लागत आहे. भारतातही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. पण, हातावर पोट असणाऱ्या वर्गाची मात्र यात दयनीय अवस्था झाली. 

अनेकांसाठी तर, या काळात दोन वेळच्या जेवणाची सोय करणंही फार कठीण होऊन बसलं आहे. आव्हानाच्या या काळात एक आजीबाई, 'अम्मा' म्हणजे जणू अनेकांची भूक भागवणाऱ्या देवदूतच ठरत आहेत. अवघ्या एका रुपयांना इडलीची विक्री करणाऱ्या या वयोवृद्ध आजीबाई सोशल मीडियापासून अनेकांच्या मनात घर करुन गेल्या आहेत. 

अत्यावश्यक सेवांमध्ये मोलाचं योगदान देऊन या कठीण प्रसंगी मदत करणाऱ्यांमध्ये के. कमलाथल अम्मा यांचंही नाव घेतलं जात आहे. तामिळनाडू येथील कोईंबतूर येथे कमलाथल अम्मा गरजू आणि गरिबांना अवघ्या एक रुपयाला घरगुती पद्धतीने बनवलेली इडली विकतात आणि भुकेलेल्यांची भूक भागवतात. 

वाचा : 'भारतीयांनी ऑफिसमध्ये जास्तवेळ काम केले तर अर्थव्यवस्था पटकन उभारी घेईल'

सूर्याची किरणं सर्वांना जाग आणण्यापूर्वीच अम्मांचा दिवस सुरु होतो. ८५ वर्षांच्या या वयातही आपल्या कामाप्रती त्या तितक्याच समर्पित आहेत. रोजचं जेवण म्हणून या इडलीवर अवलंबून असणाऱ्या अशा अनेकांसाठी अम्मा नित्यनियमाने हे काम करतात. जवळपास ३० वर्षांपासून त्या हे काम करत आहेत. बरं इथे मुख्य बाब अशी, की त्यांनी इडलीची किंमत वर्षानुवर्षे वाढवलेली नाही. गरजू आणि गरिबांना मदत करण्याचा हा त्यांचा एक अनोखा मार्ग. 

 

गेल्या कैक दिवसांपासून कोरोना व्हायरस, त्यामुळे मंदावलेलं आर्थिक चक्र आणि झालेल्या नुकसानाचीच गणितं मांडली जात असताना या वयोवृद्ध आजीबाई जीवनाकडे पाहण्याचा एक वेगळा आणि तितकाच नि:स्वार्थ दृष्टीकोन देऊन जातात असं म्हणायला हरकत नाही.