भाजपात मोठ्या संघर्षाची चाहूल; 'या' नेत्याने मारली अमित शहांच्या बैठकीला दांडी

ओम प्रकाश माथूर हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात.

Updated: Jul 5, 2018, 04:15 PM IST
भाजपात मोठ्या संघर्षाची चाहूल; 'या' नेत्याने मारली अमित शहांच्या बैठकीला दांडी title=

लखनऊ: आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या असतानाच भाजपात मोठा संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे. या पक्षातंर्गत धुसफुसीतून थेट अमित शहा यांच्या अधिकाराला आव्हान निर्माण होण्याची आहे. उत्तर प्रदेशचे प्रभारी ओम प्रकाश माथूर हे गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याचे सांगितले जाते. काही दिवसांपूर्वी अमित शहा यांनी वाराणसी येथे घेतलेल्या बैठकीला ओम प्रकाश माथूर यांनी दांडी मारून आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली. ओम प्रकाश माथूर हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात. त्यांच्याकडे सध्या भाजपाचे उपाध्यक्षपद असून ते उत्तर प्रदेशचे प्रभारीही आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पक्षाच्या काही निर्णयांवरून माथूर प्रचंड नाराज आहेत.

भाजपाचे संघटन मंत्री सुनील बन्सल यांची कार्यपद्धती माथूर यांना फारशी पसंत नाही. प्रभारी असूनही अनेक निर्णय त्यांच्या संमतीविना परस्पर घेतले जातात. त्यामुळेच गेल्या नऊ महिन्यांपासून माथूर यांनी पक्षाच्या कार्यक्रमांना जाणे सोडून दिले आहे. 
भाजपाच्या नेत्यांना याबद्दल विचारले असता त्यांनी ही शक्यता फेटाळून लावली. गेल्या काही दिवसांपासून माथूर पक्षाच्या अनेक कार्यक्रमांना गैरहजर होते, ही बाब खरी आहे. मात्र, ते इतर राज्यांतील निवडणुकांच्या तयारीत गुंतले होते. ओम प्रकाश माथूर हे उत्तम रणनीतीकार म्हणून ओळखे जातात. सध्यादेखील ते अशाच जबाबदाऱ्यांमुळे व्यग्र आहेत. वेळ पडल्यास उत्तर प्रदेशात त्यांचा सल्ला नक्की घेतला जातो, असे भाजपाचे स्थानिक प्रवक्ते राकेश त्रिपाठी यांनी सांगितले.