'आंध्र'ला धक्का, निजामुद्दीन मरकजहून परतलेल्या ४३ जणांना कोरोना

कोरोनाशी लढणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारच्या कामावर हरताळ

Updated: Apr 1, 2020, 03:21 PM IST
'आंध्र'ला धक्का, निजामुद्दीन मरकजहून परतलेल्या ४३ जणांना कोरोना title=

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशमध्ये आज कोरोनाचे ४३ जण आढळले आहेत. हे सर्वजण मरीज निजामुद्दीन मरकज सभेसाठी गेले होते. याआधी मंगळवारी मरकज येथून परतलेल्या १६ जणांना कोरोना झाल्याचे समोर आल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयातर्फे देण्यात आली. कोरोनाशी लढणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारच्या कामावर हरताळ फासण्याचे काम या निष्काळजीपणामुळे झाले आहे.

या कार्यक्रमातून निघालेलेल अनेकजण देशातील विविध राज्यांमध्ये गेले. महाराष्ट्रात अहमदनगरमधून या कार्यक्रमासाठी ३४ जण सहभागी झाले होते. पोलिसांनी या सर्वांना पकडून रुग्णालयात दाखल केले. या सर्वांच्या रक्ताचे सॅंपल चाचणीसाठी पाठवण्यात आले. २ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे यातून स्पष्ट झाले. 

नांदेडमधून १३ जण निजामुद्दीनच्या कार्यक्रमात सहभागी होते अशी माहिती दिल्ली पोलिसांनी नांदेड पोलिसांना दिली. १३ पैकी एकाची माहिती नांदेड पोलिसांना मिळाली आहे. त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. इतर १२ जणांचा पोलीस शोध घेत आहेत.

२३६१ जणांना निजामुद्दीन मरकजमधून बाहेर काढण्यात आल्याचे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सांगितले. खोकला, सर्दीचा त्रास जाणवत असलेल्या ६१७ जणांना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. बाकीच्यांना क्वारंटाईन करण्यात आल्याचे सिसोदिया म्हणाले. 

निजामुद्दीनमधल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमाने दिल्ली हादरली. या कार्यक्रमाने तर अनेकांना कोरोना झाल्याचे पुढे आले. तर काही जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे आयोजक मौलानासह सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, मौलाना साद हे २८ मार्चपासून गायब आहेत.

दिल्लीतल्या निझामुद्दीन भागात जे घडले, त्यामुळे अख्ख्या देशाची झोप उडाली आहे. निझामुद्दीन भागातल्या तबलिगी समाजाच्या धार्मिक कार्यक्रमात देशभरातून हजारोंच्या संख्येने उपस्थिती होती. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या ६ जणांचा तेलंगणात मृत्यू झाला आहे. या सर्व घडामोडींनंतर केंद्र आणि राज्य सरकारांची झोप उडाली आहे. कारण देशातल्या अनेक भागात या कार्यक्रमात सहभागी झालेल्या व्यक्ती आढळून येतायत. त्याचं महाराष्ट्र कनेक्शनही समोर येत आहे. 

निजामुद्दीनच्या कार्यक्रमात सहभागी झालेले १३० हून अधिक जण पुणे आणि परिसरात असल्याचं समोर आलंय. १४ जणांना पिंपरी-चिंचवड महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आलेत. तर आणखी १८ जणांचा शोध सुरू करण्यात आलाय. मराठवाड्यातूनही या मरकजमध्ये मोठ्या संख्येनं लोक गेल्याचं पुढं आलंय. औरंगाबादमधून ४७ जण मरकजमध्ये सहभागी झाले होते. कोल्हापूर जिल्ह्यातले २१ जणही या कार्यक्रमात सहभागी झाले होते. अमरावतीतील पाच जणांचा शोध घेऊन त्यांना जिल्हा रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील सात जण उपस्थित असल्याचंही स्पष्ट झाले आहे.

यवतमाळ जिल्ह्यातले १२ जण मरकज कार्यक्रमात सहभागी झाले होते. यापैकी यवतमाळ जिल्ह्यात वास्तव्याला असलेले ५ जण परत आले आहेत. त्यांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलंय. उर्वरीत ७ जण अजूनही जिल्ह्यात परत आलेले नाहीत. यापैकी काहीजण परस्पर दुसऱ्या जिल्ह्यात अथवा दुसऱ्या राज्यात गेल्याची अथवा दिल्लीतच थांबले असण्याची शक्यता आहे. तरीही प्रशासनाकडून त्यांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे.