मुंबई : लोकसभेच्या निवडणुकांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी ‘परदेशांतील काळा पैसा भारतात आणणार, प्रत्येक भारतीयाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करणार’ असे वक्तव्य केलं होतं. नरेंद्र मोदी यांनी केलेल्या या वक्तव्यावर विश्वास ठेवत भारतीयांनी भाजपला मत दिलं आणि बहूमतानं विजय मिळवून दिला.
भाजपचं केंद्रात सरकार आल्यानंतर पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान झाले. पंतप्रधान बनल्यापासून आतापर्यंत नरेंद्र मोदी यांनी अनेक मोठे निर्णय घेतले. त्यापैकी एक निर्णय म्हणजे नोटबंदी.
परदेशातील काळा पैसा भारतात आणण्यासाठी आणि भ्रष्टाचार नियंत्रणात आणण्यासाठी नोटबंदी करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला. मात्र, नरेंद्र मोदींनी प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचं दिलेल्या आश्वासनाचं काय? असा प्रश्न प्रत्येकजण विचारत आहे.
सर्वसामांन्यांच्या मनात हा प्रश्न आला असतानाच आता एक मेसेज सर्वांच्या मोबाईलवर येत आहे. या मेसेजमध्ये म्हटलं आहे की, "आज तुमच्या सर्वांच्याच बँक खात्यात १५ लाख रुपये जमा होणार".
आपल्या बँक खात्यात १५ लाख जमा होणार ही प्रत्येकासाठीच एक आंदाची बातमी आहे. तुम्हालाही असा SMS किंवा व्हॉट्सअॅप मेसेज आला असेल तर, तुम्ही उत्साहाच्या भरात काही आगळे-वेगळे पाऊल उचलू नका.
होय... कारण, आज १ एप्रिल आहे आणि एक एप्रिल म्हणजेच फूल करण्याचा दिवस. तुमच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा होणार हा मेसेजही एप्रिल फूलचाच एक भाग आहे.
पण तुम्ही नाराज होऊ नका तर हा मेसेज तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींना, नातेवाईकांना तसेच इतर सहकाऱ्यांना फॉरवर्ड करुन तुम्हीही त्यांची फिरकी घेऊ शकता.
(महत्वाची सूचना : ही बातमी एप्रिल फूल च्या निमित्ताने बनविण्यात आली आहे. कुणालाही दुखावण्याचा, फसविण्याचा किंवा टीका करण्याच्या उद्देशाने ही बातमी प्रसिद्ध केलेली नाहीये. तुम्हीही या बातमीचा आनंद घ्या आणि इतरांसोबतही शेअर करा)