आसाम राज्याला मुसळधार पावसाने झोडपले, एकाचा मृत्यू तर तीन लाख लोकांना फटका

आसाम राज्याला  मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. बुधवारीपासून पाऊस कोसळत आहे.  

Updated: May 28, 2020, 09:45 AM IST
आसाम राज्याला मुसळधार पावसाने झोडपले, एकाचा मृत्यू तर तीन लाख लोकांना फटका title=
ANI Photo

मुंबई : आसाम राज्याला  मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. बुधवारीपासून पाऊस कोसळत आहे. आसाममधील पूरस्थिती आणखी गंभीर झाली असून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. पावसाचा ११ जिल्ह्यातील सुमारे तीन लाख लोकांना फटका बसला आहे. तर ब्रह्मपूत्रा नदी ओसंडून वाहूत असून अतिवृष्टीमुळे राज्यातील किमान सात जिल्हे बाधित झाले आहेत.  

आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एएसडीएमए) च्या अहवालानुसार गोलपारा जिल्ह्यातील रोंगजुली येथे एकाचा मृत्यू झाला. धेमाजी, लखीमपूर, नागाव, होजई, दरंग, बारपेटा, नलबारी, गोलपारा, पश्चिम कार्बी आंग्लोंग, दिब्रूगड आणि तीनसुकिया या जिल्ह्यात सध्या सुमारे दोन लाख ७२ हजार लोक पूरग्रस्त झाले आहेत.

गोलपारा हा सर्वाधिक बाधित जिल्हा असून २.१५ लाख लोक प्रभावित झाले असून, त्यानंतर नालबारीतील २२,००० आणि नागगावमधील सुमारे ११,००० लोक आहेत. गोलपारा येथे एनडीआरएफ आणि एसडीआरएफने नऊ जणांची सुटका केली आहे, तर बाधित नागरिकांमध्ये १७२.५३ क्विंटल तांदूळ, डाळ, मीठ आणि  ८०४.४२ लिटर मोहरीचे तेल आणि अन्य आवश्यक वस्तूंचे वाटप केले.

सध्या, ब्रह्मपूत्रा जोरहाटच्या निमगिघाट येथे धोक्याची पातळी ओलांडली आहे. एएसडीएमएने सांगितले की, सध्या ३२१ गावे पाण्याखाली गेली असून २,६७८ हेक्टर पीक क्षेत्राचे नुकसान झाले आहे. अधिकारी पाच जिल्ह्यात ५७ मदत शिबिरे आणि वितरण केंद्रे चालवित आहेत. ज्यात १६,७२० लोकांनी आश्रय घेतला आहे.

गोलाघाट, बरपेटा, नलबारी, धामाजी, माजुली, होजई, सोनीतपूर, चिरंग, करीमगंज, नागाव, बोंगागाव, दिमा हसांव, बक्सा आणि लखीमपूर या ठिकाणी अनेक ठिकाणी तटबंदी, रस्ते, पूल या सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे.