योगी सरकारनं ताजमहल पाडून दाखवावं, आझम खान यांचं आव्हान

योगी सरकारनं राज्यातील पर्यटन स्थळांच्या यादीतून ताजमहलचं नाव हटवून त्यात गोरखनाथ मंदिराचा समावेश केल्यानंतर सोशल मीडियातून आणि विरोधकांकडून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात येतेय. 

Updated: Oct 4, 2017, 05:36 PM IST
योगी सरकारनं ताजमहल पाडून दाखवावं, आझम खान यांचं आव्हान  title=

लखनऊ : योगी सरकारनं राज्यातील पर्यटन स्थळांच्या यादीतून ताजमहलचं नाव हटवून त्यात गोरखनाथ मंदिराचा समावेश केल्यानंतर सोशल मीडियातून आणि विरोधकांकडून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात येतेय. 

या मुद्यावर उत्तर प्रदेश सरकारमधील माजी मंत्री आझम खान यांनीही योगी सरकारवर निशाणा साधलाय. ताजमहल, कुतुब मीनार, लाल किल्ली आणि संसद हे गुलामगिरीचे प्रतिक आहेत... यूपी सरकारनं चांगली सुरुवात केलीय, असं म्हणत त्यांनी योगी सरकारला टोला लगावलाय. एकावेळी ताजमहलला पाडण्याच्या वल्गना केल्या जात होत्या... जर योगींनी असा निर्णय घेतला तर आम्हीही त्यांना साथ देऊ, असंही त्यांनी म्हटलंय.  

काय आहे प्रकरण

भारतासाठी आणि उत्तरप्रदेशसाठी आत्तापर्यंत जे पर्यटन स्थळ गौरवास्पद होतं त्याच पर्यटनस्थळाला राज्य सरकार विसरलंय. जगातलं सातवं आश्चर्य असलेल्या आगरा स्थित ताजमहलकडे उत्तरप्रदेशच्या पर्यटन विभागानं कानाडोळा केलाय. यूपी सरकारनुसार, ताजमहल हे पर्यटन स्थळ नाही. यंदा योगी सरकारनं तयार केलेल्या पर्यटन स्थळांच्या यादीतून ताजमहलचं नाव काढून टाकण्यात आलंय. ही गोष्ट समोर आल्यानंतर एका मोठ्या वादाला तोंड फुटलंय.

योगींच्या गोरखनाथ मंदिराचा समावेश

उल्लेखनीय म्हणजे, ताजमहलचं नाव हटवून योगी सरकारनं गोरखपूरच्या गोरखनाथ मंदिराला या बुकलेटमध्ये समाविष्ट केलंय. नाथ संप्रदायाशी निगडीत यूपीच्या बलरामपूरस्थित देवी पाटन शक्ती पीठालाही या पर्यटन स्थळांच्या यादीत स्थान मिळालंय. या बुकलेटमधील दोन पानं भरून केवळ गोरखनाथ मंदिरावर माहिती देण्यात आलीय.

अयोध्येचाही समावेश

या बुकलेटमध्ये अयोध्येचाही समावेश पर्यटन स्थळांत करण्यात आलाय. बुकलेटच्या बाराव्या आणि तेराव्या पानावर अयोध्येबद्दल सविस्तर माहिती देण्यात आलीय. 

योगी आदित्यनाथ यांनी यापूर्वीही अनेकदा 'ताजमहल'बद्दल अनेक वादग्रस्त वक्तव्य केलेत. बिहारच्या एका रॅलीत त्यांनी 'ताजमहल म्हणजे केवळ एक इमारत' असल्याचं म्हटलं होतं. ताजमहल हे भारतीय संस्कृतीचा भाग असल्याचंही मानण्यास त्यांनी नकार दिला होती. यूपीच्या पर्यटन बुकलेटमध्ये टुरिजमपासून मंदिर टूरिझमपर्यंत अनेक गोष्टींचा समावेश करण्यात आलाय परंतु, त्यात ताजमहलला जागा नाही.