बाबा का ढाबा : मालक कांता प्रसाद यांची युट्यूबरविरोधात तक्रार

यामध्ये घोटाळा झाल्याचा संशय

Updated: Nov 2, 2020, 08:46 AM IST
बाबा का ढाबा : मालक कांता प्रसाद यांची युट्यूबरविरोधात तक्रार title=

नवी दिल्ली : 'बाबा का ढाबा' प्रकरणाला वेगळ वळण मिळालं आहे. ढाब्याचे मालक कांता प्रसाद यांनी इंस्टाग्राम इन्फ्ल्यूएंसर आणि यूट्यूबर गौरव वासनविरोधात पैशांचा घोटाळा केल्याची तक्रार दाखल केलीय. कांता प्रसाद यांना पैसे देण्याचे आवाहन  गौरव याने केले होते. ही पोस्ट खूप वायरल झाली. पण गौरवने कांता प्रसाद यांचा अकाऊंट नंबर न देता स्वत:चा अकाऊंट नंबर दिला होता. यामध्ये घोटाळा झाल्याचा संशय आहे. 

बाबा का ढाबाचे मालक कांता प्रसाद यांच्या संघर्षाची कहाणी सांगणारा व्हिडीओ गौरव वासनने बनवला. जो सोशल मीडियात खूप वायरल झाला. बाबा का ढाबा येथे लोकांनी गर्दी केली. आणि कांता प्रसाद यांनी बनवलेलं जेवण काही मिनिटात संपू लागलं. वासनने आपला व्हिडीओ बनवून ऑनलाईन शेअर केला आणि सोशल मीडियात पैसे देण्याचे आवाहन केले. हे करताना त्याने जाणूनबुजून स्वत:चा आणि स्वत:च्या ओळखीच्यांचा अकाऊंट नंबर दिल्याची तक्रार कांता प्रसाद यांनी पोलिसांत केली. कांता प्रसाद यांना माहिती न देता मोठी रक्कम गोळा केली. कांता प्रसाद यांनी वारंवार पैशांबद्दल मागणी केली पण त्याने कोणतीही माहिती दिली नसल्याचेही त्यांनी तक्रारीत म्हटलंय. 

मालवीय नगर पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस याप्रकरणी चौकशी करत आहेत. पण आतापर्यंत कोणतीही एफआयआर दाखल न झाल्याचे सांगण्यात येतंय. 

'बाबा का ढाबा' ट्वीटरवर ट्रेंड करु लागला होता. पण हा व्हिडीओ बनवणारा युट्यूबर गौरव आरोपीच्या पिंजऱ्यात आहे. झी न्यूजने यासंदर्भात ग्राऊंड रिपोर्ट केला होता. त्यामध्ये बाबा का ढाबा आता पुर्वपदावर येऊ लागल्याचे म्हटले होते. म्हणजे इथली गर्दी नाहीशी झालीय. एखाददुसरा व्यक्ती इथे जेवण्यासाठी येतो. व्हिडीओ आणि सेल्फी काढणाऱ्या व्यक्ती इथे आता दिसत नाहीत. २० दिवसानंतर जेव्हा झी न्यूजने कांता प्रसाद यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा परिस्थिती पहिल्यासारखीच झाल्याचे त्यांनी सांगितले होते.