Bank Strike : बँकांचा महा संप! डिसेंबर महिन्यात बँक अनेक दिवसांसाठी बंद, नागरिकांची मोठी गैरसोय

Bank Strike Latest News : डिसेंबर महिन्यातील बँकांची कामं आता पूर्ण करणं शक्य असेल तर करून घ्या, पाहा कधी आणि किती दिवसांसाठी आहे हा संप...    

सायली पाटील | Updated: Nov 17, 2023, 12:13 PM IST
Bank Strike : बँकांचा महा संप! डिसेंबर महिन्यात बँक अनेक दिवसांसाठी बंद, नागरिकांची मोठी गैरसोय  title=
Bank Employees Strike will result in no working days for bank latest update

Bank Strike Latest News : राज्य शासनानं नुकतीच 2024 या वर्षातील शासकीय सुट्ट्यांची यादी जाहीर केली. ज्यामध्ये पुढच्या वर्षात सरकारी खात्यात नोकरीवर असणाऱ्यांवर सुट्ट्यांची बरसात होणार असल्याचं जाहीर केलं. थोडक्यात या दिवसांना बहुतांश बँकाही बंद असणार आहेत. पण, तत्पूर्वी डिसेंबर महिन्यातही बँका बऱ्याच दिवसांसाठी बंद राहणार असून, त्यामुळं खातेधारकांची मोठी गैरसोय होणार आहे. 

डिसेंबर महिन्यातील विविध दिवशी विविध बँकांमधील कर्मचारी संपावर जाणार आहेत. ऑल इंडिया बंक एंप्लॉई असोसिएशन (AIBEA) कडून यासंदर्भातील माहिती देणारं एक पत्रक जारी करण्यात आलं. जिथं 2023 मध्ये वेगवेगळ्या तारखांना बँका बंद राहतील असं सांगण्यात आलं. PTI च्या माहितीनुसार 4 डिसेंबरला हा संप सुरु होणार असून, तो 11 डिसेंबरला संपणार आहे. 

संपाच्या हाकेमुळं कोणकोणत्या बँका कधी बंद राहतील? 

  • 4 डिसेंबर 2023- भारतीय स्टेट बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँकेतील कर्मचाऱ्यांचा संप 
  • 5 डिसेंबर 2023 - बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडियामध्ये संप 
  • 6 डिसेंबर 2023 - कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये संप 
  • 7 डिसेंबर 2023 - इंडियन बँक, युको बँकेतील कर्मचारी संपावर 
  • 8 डिसेंबर 2023 - युनियन बँक, इंडिया बँक, बँक ऑफ महाराष्ट्रचा संप 
  • 9,10 डिसेंबर 2023 - शनिवार, रविवार असल्यामुळं बँकांची साप्ताहिक सुट्टी 
  • 11 डिसेंबर 2023 - खासगी बँकांमधील कर्मचारी संपावर 

AIBEA नं दिलेल्या माहितीनुसार प्रस्तावित कर्मचारी संपामुळं बँकेतील खातेधारकांना मोठ्य़ा अडचणींचा सामना करावा लागणार आहे. 4 ते 11 डिसेंबरदरम्यान, विविध बँकांमध्ये टप्प्याटप्प्यानं हे संप पुकारण्यात येणार असल्यामुळं बँकेची कामं ताटकळणार आहेत. त्यामुळं तुम्हीही काही कामं डिसेंबर महिन्यासाठी राखून ठेवली असतील, तर शक्य असल्यास ती आताच पूर्ण करून घ्या. अन्यथा तुमच्याही अ़डचणी वाढतील. 

हेसुद्धा वाचा : पुढचं वर्ष सुट्ट्यांचं; 2024 मध्ये शनिवार, रविवारला जोडून नऊ सुट्टय़ा, आताच भटकंतीचे बेत आखा

काय आहेत कर्मचाऱ्यांच्या मागण्या? 

बँकेत पुरेशी कर्मचारीसंख्या असावी ही या संपातील प्रमुख मागणी आहे. याव्यतिरिक्त बँकिंग क्षेत्रात केल्या जाणाऱ्या आउटसोर्सिंगवर बंदी आणत कायमस्वरुपी नोकरीच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून द्याव्यात अशा मागण्यांचा समावेश आहे. मागील काही काळापासून निम्न दर्जाच्या पदांसाठी मोठ्या प्रमाणात आउटसोर्सिंग करण्यात आलं होतं. करार तत्त्वावर असणाऱ्या या कर्मचाऱ्यांमुळं खातेधारकांच्या खासगी माहितीचा तपशीलही धोक्यात आल्याचं निष्पन्न झालं, अशी माहिती AIBEA च्या सचिवपदी असणाऱ्या सी.एच.वेंकटचलम यांनी दिली.