देशातील सर्वात लांब पुलाचा भाग कोसळला; एकाचा मृत्यू, तर अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता

Bihar bridge Accident : बिहारमध्ये मोठी दुर्घटना घडली असून कंस्ट्रक्शन सुरू असलेल्या पूलाचा काही भाग कोसळला ( Bridge Part Collapse) आहे. या घटनेमध्ये एका मजुराचा मृत्यू झाला तर अनेक मजूर ढिगाऱ्याखाली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.  

श्वेता चव्हाण | Updated: Mar 22, 2024, 12:23 PM IST
देशातील सर्वात लांब पुलाचा भाग कोसळला; एकाचा मृत्यू, तर अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता title=

Bihar bridge accident in marathi : बिहारमधील सुपौल जिल्ह्यात  कंस्ट्रक्शन सुरू असलेल्या पूलाचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी (22 मार्च) सकाळी देशातील मोठा पूल बांधकाम सुरु असताना हा पुल कोसळला आहे. कोसी नदीवर बांधण्यात येत असलेल्या बकौर पुलाचा मोठा भाग तुटून खाली पडला आहे. ज्यामध्ये एका मजुराचा मृत्यू झाला. तर आठ जण जखमी झाले आहेत. स्लॅबखाली 40 हून अधिक लोक दबल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

या घटनेची माहितीदेताना सुपौलचे डीएम कौशल कुमार यांनी सांगितले की, ही घटना सकाळी 7.30 वाजता घडली असून ज्यामध्ये 8 जण जखमी झाले आहेत. तर एका मजूराचा मृत्यू झाला आहे. या मृताच्या कुटूंबांना 10 लाख रुपयांची भरपाई दिली जाणार आहे. तसेच जखमी मजूरांना मदत केली जाईल, अशी माहिती देण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. 

याघटनेबाबत  ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, शुक्रवारी सकाळी 153 मजूर 154 क्रमांकाच्या खांबांमध्ये स्लॅब बसवण्याचे काम करत होते. नेमका त्याचवेळी पुलाचा गर्डर कोसळून खाली पडला. या गर्डर खाली अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या घटनास्थळी अजूनही बचावकार्य सुरू आहे. तसेच घटनास्थळी एनडीआरएफ आणि स्थानिक पोलिसांची पथके तैनात करण्यात आले आहे. या अपघातानंतर कंपनीचे कर्मचारी आणि अधिकारी घटनास्थळावरून पसार झाले आहेत. या संपूर्ण प्रकरणात सुपौल एसपी म्हणाले की, सहा जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सुपौलच्या बकोरमध्ये हा पूल बांधला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या पुलाचे काम ट्रान्स रेल कंपनी करत आहे. पुलाची एकूण लांबी 10.5 किमी आहे आणि 412.23 कोटी रुपये खर्चून 2.5 किमीचा मार्ग देखील आहे. हा पूल देशातला सर्वात लांब पुल असून सुपौलमधील बकोर ते मधुबनीतील भेजापर्यंत बांधला जाणार आहे. या घटनेबाबत एनएचएआयचे प्रादेशिक अधिकारी आरबी सिंग यांनी सांगितले की, या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. हा पूल गेमन लिमिटेड बांधत आहे. कोसी नदीवर बांधण्यात येत असलेल्या या पुलामध्ये एकूण 171 खांब बांधले जाणार आहेत, त्यापैकी 113 खांबांचे काम वेगाने सुरू आहे. बकौर बाजूकडून 36 खांब आणि भेजा बाजूकडून 87 खांब बनवले जाणार आहेत. बकौर बाजूपासून 2.1 किलोमीटरचा रस्ता आणि भेजा बाजूकडून एक किलोमीटरचा रस्ता तयार केला जाईल. अप्रोच रोडसह, पुलाची लांबी 13.3 किलोमीटर असेल. भारतमाला प्रकल्पांतर्गत मधुबनीमधील उमगाव ते महिषी तारापीठ (सहरसा) दरम्यान बांधण्यात येत असलेल्या चौपदरी रस्त्याच्या अलाइनमेंटमध्ये हा पूल बांधला जात आहे.

बिहारमध्ये पूल कोसळण्याची ही पहिलीच घटना नाही. मागील वर्षी भागलपूरमधील खगरिया-अगुवानी-सुलतानगंज दरम्यान बांधण्यात येत असलेला पूल कोसळल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. पुलाचा काही भाग गंगा नदीत बुडाला होता. सीएम नितीश कुमार यांनी 2014 मध्ये या पुलाची पायाभरणी केली होती. ज्याची किंमत 1717 कोटी रुपये होती. 2023 मध्ये पूर्णियामध्ये कास्टिंग दरम्यान बॉक्स ब्रिज कोसळला होता. 2022 साली बेगुसराय येथील गंडक नदीवर बांधलेला पूल उद्घाटनापूर्वीच कोसळला होता. ज्याची किंमत 14 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले.