बिहारमधील महिलेने एकाच वेळी दिला 5 बाळांना जन्म; डॉक्टरही झाले थक्क

Woman Gave Birth To 5 Children At Once: या बाळांच्या जन्माबद्दलची माहिती अनेक दिवस महिलेचे निवडक नातेवाईक आणि डॉक्टर यांनाच होती. यासंदर्भातील खुलासा नुकताच करण्यात आल्यानंतर संपूर्ण राज्यात या बाळंतपणाची चर्चा असून डॉक्टरांनाही यामुळे आश्चर्याचा धक्का बसला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 7, 2023, 01:45 PM IST
बिहारमधील महिलेने एकाच वेळी दिला 5 बाळांना जन्म; डॉक्टरही झाले थक्क title=
यासंदर्भातील माहिती फक्त डॉक्टर आणि या महिलेच्या नातेवाकांना होती (फाइल फोटो - सौजन्य : रॉयटर्स)

Woman Gave Birth To 5 Children At Once: बिहारमधील सीवान जिल्हामध्ये एक बाळांतपण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. हे बाळांतपण एखाद्या चमत्कारासारखं असल्याचं म्हटलं जात आहे. सामान्यपणे एखादी महिला बाळांतीण होते तेव्हा ती 2 किंवा जास्तीत जास्त 3 बाळांना एकाच वेळी जन्म देते. मात्र सीवानमधील एका महिलेने एकाच वेळी 5 बाळांना जन्म दिला आहे. या महिलेचं नाव पुजा सिंह असं आहे. मात्र या महिलेनं जन्म दिलेल्या 5 बाळांपैकी केवळ 2 बाळं जिवंत असून 3 बाळांचा मृत्यू झाला आहे. मात्र एकाच वेळी एका महिलेने 5 बाळांना जन्म दिल्याचं पाहून डॉक्टरांनाही आश्चर्याचा धक्का बसला.

3 मुलं आणि 2 मुली

सध्या पुजाच्या या बाळांतपणाची चर्चा संपूर्ण बिहारमध्ये सुरु आहे. सीवानमधील हसनपुरा येथील तिलौता रसूलपुर गावाची रहिवाशी आहे. या माहिलेने सीवानमधील एका खासगी रुग्णालयामध्ये एकाच वेळी 5 बाळांना जन्म दिला. मात्र यापैकी 2 बाळं मृतावस्थेतच गर्भातून बाहेर काढण्यात आली. गर्भाबाहेर काढल्यानंतर 3 बाळं जिवंत होती. त्यापैकी एका बाळाचा नंतर मृत्यू झाला. पुजाने जन्म दिलेल्या 5 बाळांपैकी 2 बाळं जिवंत असून त्यांची प्रकृती उत्तम असल्यांच डॉक्टरांनी सांगितलं आहे. पुजाने जन्म दिलेल्या बाळांपैकी 3 मुलं होती तर 2 मुली होत्या. प्रसुतीच्यावेळी 2 मुलांचा मृत्यू झाला. जन्मानंतर काही दिवसांनी एका मुलीचाही मृत्यू झाला. सध्या पुजाची एक मुलगी आणि मुलगा जिवंत असून त्यांची प्रकृती ठणठणीत आहे.

बऱ्याच दिवसांनी जाहीर केली माहिती

समोर आलेल्या माहितीनुसार 5 बाळांना या महिलेने जन्म दिल्याची माहिती केवळ डॉक्टर आणि या महिलेच्या नातेवाईकांना होती. मात्र जगलेल्या 2 मुलांच्या नामविधीनंतर यासंदर्भात इतरांना कळवण्यात आलं. ही माहिती समोर आल्यानंतर ती वाऱ्याच्या वेगासारखी पसरली. सीवान जिल्ह्यासहीत संपूर्ण बिहारमध्ये या बाळंतपणाची चर्चा झाली. सध्या पुजा ही तिचे वडील श्याम बिहारी सिंह यांच्या घरी म्हणजेच स्वत:च्या माहेरी, सिसवन येथील नंद मुडा गावातील घरी आहे. 3 दिवसांपूर्वीच पुजाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या डॉक्टरांनी पुजा आणि दोन्ही बाळांसाठी काही आठवड्यांचा औषधांचा कोर्स दिला आहे.

सर्वाधिक बाळांच्या जन्माचा विश्विक्रम कोणाच्या नावे?

दक्षिण आफ्रिकेमध्ये 2021 साली जून महिन्यात 37 वर्षीय गोसियामी धमारा सिटहोल नावाच्या महिलेने एकाच वेळी 10 बाळांना जन्म दिला होता. यामध्ये 7 मुलं आणि 3 मुलींचा समावेश होता. या महिलेची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. यापूर्वीच म्हणजेच मे 2021 मध्ये माली येथील एका महिलेने 9 बाळांना जन्म देण्याचा विक्रम नोंदवला होता. अवघ्या महिन्याभरात गोसियामी धमारा सिटहोलने हा विक्रम स्वत:च्या नावावर केला.