खेळण्यातील गाड्यांप्रमाणे कार वाहून गेल्या; मनालीमधील निसर्गाचं रौद्ररुप दाखवणारा VIDEO व्हायरल

Himachal Pradesh Rain: पावसाने सध्या अनेक राज्यांमध्ये हाहाकार माजवला आहे. दिल्ली (Delhi), पंजाब (Punjab), जम्मू काश्मीरसह (Jammu Kashmir) हिमाचल प्रदेशलाही (Himachal Pradesh) पावसाने झोडपलं आहे. हिमालच प्रदेशातील काही व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाले असून पर्यटकांचं आवडतं ठिकाण असणाऱ्या या ठिकाणचे व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर काटा उभा राहील.   

शिवराज यादव | Updated: Jul 9, 2023, 05:18 PM IST
खेळण्यातील गाड्यांप्रमाणे कार वाहून गेल्या; मनालीमधील निसर्गाचं रौद्ररुप दाखवणारा VIDEO व्हायरल title=

Himachal Pradesh Rain: देशात सध्या पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक राज्यांमध्ये हाहाकार माजवला आहे. दिल्ली (Delhi), पंजाब (Punjab), जम्मू काश्मीरसह (Jammu Kashmir) हिमाचल प्रदेशलाही (Himachal Pradesh) पावसाने झोडपलं आहे. हिमालच प्रदेशातील काही व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाले असून पर्यटकांचं आवडतं ठिकाण असणाऱ्या या ठिकाणचे व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर काटा उभा राहील. 

हिमाचल प्रदेशातील मंडीच्या बंजार औट बायपास आणि औटला जोडणारा 40 वर्ष जुना पूल व्यास नदीच्या पुरात वाहून गेला आहे. पूल वाहतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये काही सेकंदात संपूर्ण पूल पाण्यात वाहून जाताना दिसत आहे.

दरम्यान, नदीला आलेला पुरात अनेक गाड्याही वाहून गेल्या आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत खेळण्यांप्रमाणे गाड्या वाहून जाताना दिसत आहेत. यामध्ये पर्यटकांच्या गाड्या अधिक दिसत आहेत. यामुळे अनेक पर्यटक अडकून बसले आहेत. कारण पुरामुळे अनेक रस्ते बंद झाले असून वाहतूक खोळंबली आहे. 

दरम्यान मुसळधार पावसामुळे मनाली आणि कुल्लू येथील अनेक ठिकाणी जमीन खचली आहे. यामुळे कुल्लू मनाली आणि मनालीहून अटल बोगदा आणि रोहतांगदरम्यानचा रस्ता बंद करण्यात आला आहे. येथील नदी आणि नाले दुथडी भरुन वाहत आहेत. यामुळे सरकारने सर्व शाळा आणि शिक्षण संस्थांना 10 आणि 11 जुलैला सुट्टी जाहीर केली आहे. राज्यात गेल्या 24 तासात 5 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. 

दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

हवामान विभागाने, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पावसाने आधीच यंत्रणा कोलमडलेली असताना आणखीन पाऊस पडल्यास परिस्थिती कोलमडू शकते. कुल्लूमध्ये व्यास नदीला पूर आल्याने चंदीगड-मनाली राष्ट्रीय महामार्ग 3 चा एक भाग वाहून गेला आहे. तर उत्तराखंडमध्ये जमीन खचल्याचे अनेक फोटो, व्हिडीओ समोर आले आहेत. त्यातच हवामान विभागाने इशारा दिला असल्याने प्रशासन हाय अलर्टवर आहे. 

हे राष्ट्रीय महामार्ग बंद

शनी मंदिर औटजवळ जमीन खचल्याने आणि दरड कोसळल्याने मंडी-कुल्लू राष्ट्रीय महामार्ग बंद झाला आहे. कटौल येथून जाणारा मंडी-कुल्लू मार्गही बंद झाला आहे. पंडोह-गोहर-चैलचौक-बग्गी-सुंदरनगर रस्ता सुरु करण्यात आला आहे, पण येथून जड वाहतूक बंद आहे. 

हिमाचल प्रदेशातील कालका-शिमला रेल्वे मार्गावर मुसळधार पावसामुळे बोगदा क्रमांक 10 येथील कोटी आणि संवारा रेल्वे स्थानकांदरम्यानचा रेल्वे मार्ग बंद करण्यात आला आहे.