होय, ढगांच्या दाटीमुळे विमाने रडारपासून वाचू शकतात- एअर मार्शल नंबियार

प्रत्येक रडार वेगवेगळ्या तंत्रज्ञानानुसार काम करते.

Updated: May 27, 2019, 01:45 PM IST
होय, ढगांच्या दाटीमुळे विमाने रडारपासून वाचू शकतात- एअर मार्शल नंबियार title=

भटिंडा: ढगाळ वातावरणामुळे भारतीय वायूदलाचे अधिकारी बालाकोट हल्ल्याची योजना पुढे ढकलायच्या विचारात होते. परंतु, ढगांमुळे रडारपासून विमानांचा बचाव होईल, असे मी त्यांना सांगितले. त्यामुळे नियोजित दिवशीच बालाकोट एअर स्ट्राईक झाला, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. मात्र, ढगांमुळे रडारपासून विमानांचा बचाव होतो, या दाव्यावरून अनेकांनी मोदींची खिल्ली उडविली होती. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मोदींचे हे वक्तव्य चांगलेच गाजले होते. अनेकांनी मोदींचा हा दावा हास्यास्पद ठरवला होता. 

मात्र, आता भारतीय वायूदलाच्या वेस्टर्न एअर कमांडचे प्रमुख एअर मार्शल रघुनाथ यांनी मोदींच्या या दाव्याचे समर्थन केले आहे. त्यांनी म्हटले की, आकाशात ढगांची खूप दाटी असेल तर एखाद्या विमानाचा शोध लावण्यात रडारला अडथळे येऊ शकतात. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा दावा काही प्रमाणात खरा असल्याचे एअर मार्शल नंबियार यांनी 'एएनआय' या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. 

यापूर्वी लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनीही केरळमधील एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पाठराखण केली होती. प्रत्येक रडार वेगवेगळ्या तंत्रज्ञानानुसार काम करते. त्यामुळे काही रडारमध्ये ढगांच्या पल्याड जाण्याची क्षमता असते तर काहींमध्ये नसते. रडार हाताळण्याच्या पद्धतीवरही ढगांच्यापलीकडे जाऊन विमानाचा शोध घेतला जातो की नाही, ही गोष्ट अवलंबून असते. त्यामुळे कधी तरी ढग असूनही विमानांचा पत्ता लागतो किंवा कधीतरी लागत नाही, असे रावत यांनी म्हटले होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान हे वक्तव्य केले होते. बालाकोट एअर स्ट्राईकच्यावेळी वातावरण खराब होते. त्यामुळे त्या रात्री हल्लाची योजना रद्द करण्याचा विचार वायूदलाचे अधिकारी करत होते. मात्र, ढगाळ वातावरणामुळे भारतीय विमानांना पाकिस्तानी रडारपासून लपता येईल, असे मी अधिकाऱ्यांना सुचवल्याचे मोदींनी म्हटले होते.