राज्यात पारा घसरला, पाहा कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तापमान

संपूर्ण महाराष्ट्राला हुडहुडी भरवणारी थंडी अखेर राज्यात दाखल

Updated: Dec 22, 2020, 09:58 PM IST
राज्यात पारा घसरला, पाहा कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तापमान title=

मुंबई : संपूर्ण महाराष्ट्राला हुडहुडी भरवणारी थंडी अखेर राज्यात दाखल झाली आहे. नवीन वर्षाची चाहूल लागण्याआधी अखेर बहुप्रतिक्षीत थंडी राज्यात दाखल झाली. अवकाळीनं धुमाकूळ घातल्यानंतर आताकुठं राज्यात तापमानाचा पारा खाली उतरलाय. तोही थोडा थोडका नाही तर चक्क 5 अंशांपर्यंत खाली.. राज्यात कोणत्या जिल्ह्यात किती तापमान आहे.

लांबलेला परतीचा पाऊस, नंतर अवतरलेला अवकाळी, यामुळे संपूर्ण राज्यालाच हुडहुडी भरलीय. जम्मू काश्मीरसह उत्तरेकडील राज्यात तुफान बर्फवृष्टी होतेय. गुलमर्गसह अनेक भागात तापमान मायनस 11 अंश सेल्सिअसपर्यंत खाली गेलंय. त्याचा परिणाम सहाजिकच राज्यात झालाय. महाराष्ट्राचं मिनी काश्मीरही गोठलं आहे. महाबळेश्वरमध्ये पारा 6 अंशापर्यंत खाली गेला आहे. वेण्णा लेक परिसरात बोटीच्या जेट्टीवर, गाडीच्या टपावर साचलेले दवबिंदू गोठले आहेत.

राज्यात सर्वात निचांकी तापमान परभणीत नोंदवलं गेलं आहे. परभणीत पारा 5.1 अंश सेल्सिअस आणि त्याखालोखाल धुळ्यात 5.5 अशं सेल्सिअसपर्यंत खाली आलाय.

परभणी धुळ्यापाठोपाठ नाशिक जिल्ह्यातल्या निफाडमध्ये 6.5सेल्सिअस तापमान आहे. त्या मानानं जळगावात पारा 11 अंशांवर आहे.. पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापूर सातारा सांगलीतही थंडीमुळं स्वेटर घालून आणि शेकोट्या पेटवून कामं सुरू झाली आहेत. मध्यप्रदेशला लागून असल्यानं विदर्भ आणि उत्तरेकडील भागात तुरळक ठिकाणी दवाळ फ्रॉस्टची शक्यता अमरावतीच्या शिवाजी कृषी महाविद्यालयाचे हवामान तज्ञांनी वर्तविली आहे.

उत्तर भारतात तुफान बर्फवृष्टीचा परिणाम राज्यात मुंबई वगळता सगळीकडे दिसतोय. मुंबईकर फक्त रात्री आणि सकाळी थंडीची झुळूक अनूभवत आहे. तिकडे ग्रामीण भागात थंडी रब्बी हंगामातील पिकाला पोषक ठरतेय. तर तूरीसह द्राक्ष बागांची जास्त काळजी घ्यावी लागतेय. काही का असेना पण बोचरी थंडी कितीही हुड़हुडी भरवत असली तरी हवीहवीशीच वाटते आहे.