संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल

...त्या आमदाराला त्याची जागा दाखवून द्या असे आवाहन त्यांनी केले होते. 

Updated: Apr 13, 2018, 07:52 PM IST
संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल  title=

येळ्ळुर, बेळगाव : येळ्ळूर येथील महाराष्ट्र मैदानावर प्रक्षोभक विधाने केल्याचा ठपका ठेऊन शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजीराव भिडे यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या तक्रारीवरून बेळगाव पोलीस आयुक्तालयानं ही कारवाई केली आहे.

'माजी आमदाराला व हे मैदान उद्ध्वस्त करणाऱ्याला त्याची जागा दाखवून द्या... सर्व महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना विजयी करून मराठी बाणा दाखवा', असं जाहीर आवाहन संभाजी भिडे यांनी गुरुवारी सीमाभागातील येळ्ळुर इथल्या महाराष्ट्र मैदानात केलं होतं.

'मी अनेक कुस्ती मैदाने पाहिली पण येळ्ळुरचे महाराष्ट्र मैदान देशातील एक अव्वल दर्जाचे मैदान आहे... त्याची अनुभूती आज आली...' असंही त्यांनी यावेळी म्हटलं. 

येणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारालाच विजयी करा... या महाराष्ट्र मैदानाला तोडच नाही... तो माजी आमदार महाराष्ट्र मैदान उद्ध्वस्त करू पाहत होता... त्या आमदाराला त्याची जागा दाखवून द्या असे आवाहन त्यांनी केले होते. संभाजी भिडेंची ही विधानं आचारसंहितेच्या कचाट्यात अडकली आहेत.

याअगोदर, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शुक्रवारी कर्नाटक प्रशासनाने सिमेंट काँक्रीटच्या चौथऱ्यावर उभारण्यात आलेला 'महाराष्ट्र राज्य, येळ्ळुर' नावाचा फलक हटवल्यानंतर सुरु झालेल्या वादामुळे येळ्ळुर हे गाव चर्चेत आलं होतं.

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणातही आरोप

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणातही हिंसा भडकावण्याचा आरोप संभाजी भिडे यांच्यावर करण्यात येतोय. परंतु, खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्लीन चीट देऊन टाकलीय. संभाजी भिडे गुरुजींचा भीमा कोरेगाव घटनेत सहभाग नाही... घटना घडली त्याच्या सहा महिने आधीही भीमा-कोरेगाव भागात भिडे गुरुजींचा संचार नाही, असं विधान मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केलं होतं. कोरेगाव भिमामध्ये उसळलेली दंगल त्यांच्याच चिथावणीमुळं भडकली, असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकरांनी केलाय. तर यामागं राजकीय षडयंत्र असून, त्याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी भिडे गुरूजींनी केलीय.

कोण आहेत संभाजी भिडे?

मनोहर भिडे हे त्यांचं मूळ नाव, पण संभाजी भिडे गुरूजी म्हणून ते प्रसिद्ध आहेत. वय वर्षं 80 आहे. या वयातही ते दररोज १५० जोर, १५० बैठका आणि १५० सूर्यनमस्कार घालतात. पायात चपला न घालता अनवाणीच फिरतात. प्रवास करायचा झाला तर सायकल किंवा एसटीनंच. साता-यातलं सबनीसवाडी हे त्यांचं मूळ गाव. न्यूक्लिअर फिजिक्समध्ये एम.ए. केल्यानंतर ते फर्ग्युसन महाविद्यालयात प्राध्यापक होते. पूर्वी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत होते. मात्र मतभेद झाल्यानंतर त्यांनी 1984 मध्ये श्रीशिवप्रतिष्ठान हिन्दुस्थान नावाची संघटना उभी केली. या संघटनेत विविध जातीधर्माच्या तरूणांचा समावेश असून, त्यातल्या प्रत्येकाला धारकरी म्हणतात... 

गडकोट मोहीम आणि दुर्गामाता दौड असे दोन प्रमुख कार्यक्रम ही संघटना राबवते. नवरात्रौत्सवाच्या काळात नऊ दिवस चालणा-या या दौडीची सांगता दस-याला होते. दररोज रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीची पूजा, राज्याभिषेक दिन, धर्मवीर बलिदान मास, जनजागरण, इतिहास अभ्यास परिषद असे धार्मिक आणि प्रबोधनपर कार्यक्रम संघटनेमार्फत राबवले जातात. आतापर्यंत एक लाख शिवचरित्र घराघरात पोहोचवण्याचे श्रेय भिडे गुरूजींनाच दिलं जातं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांची चांगलीच जवळीक आहेत. एवढंच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदींशी देखील त्यांचे सौहार्दपूर्ण संबंध आहेत. सर्वच पक्षातील नेते भिडे गुरुजींना गुरुस्थानी मानतात. १ मे २०१६ रोजी सांगलीत शिवसेना आणि शिवप्रतिष्ठान यांचा संयुक्त मेळावा झाला होता. त्यावेळी भिडे गुरूजींनी शिवसेनेचं कौतुक करताना, भाजपवर अप्रत्यक्ष टीका केली होती.