WHOने भारतात आढळलेल्या कोरोना व्हेरिएन्टला दिलं नवं नाव

कोरोना व्हायरसने देशातचं नाही तर संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे.

Updated: Jun 1, 2021, 08:10 AM IST
WHOने भारतात आढळलेल्या कोरोना व्हेरिएन्टला दिलं नवं नाव  title=

मुंबई : कोरोना व्हायरसने देशातचं नाही तर संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. देशात आलेल्या दुसऱ्या लाटेने तर अनेकांचे प्राण घेतले. अशात कोरोना विषाणूच्या उत्पत्तीसंदर्भात सुरू असलेल्या वादात जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना व्हेरिएन्टचं नाव बदललं आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेस जबाबदार असलेल्या B.1.617.2 या व्हेरिएन्टचं नाव 'डेल्टा' असं ठेवलं आहे. तर B.1.617.1 या व्हेरिएन्टचं नाव 'कप्पा' असं ठेवलं आहे. 

दरम्यान कोरोनाच्या B.1.617.2 स्ट्रेनला भारतीय व्हेरिएन्ट म्हणून संबोधलं जात असल्यामुळे याप्रकरणी भारताने नाराजी व्यक्त केली. कोरोनाच्या कोणत्याही स्ट्रेनला देशाचं नाव दिलं जावू  नये असं WHOने सांगितलं होतं. भारतात अढळलेला B.1.617 स्ट्रेन आतापर्यंत 53 देशांमध्ये आढळून आला आहे. WHO ने जगभरातील एक्सपर्ट, शास्त्रज्ञ आणि राष्ट्रीय प्राधिकरण यांच्याशी सल्ला मसलत करुन हा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनाच्या  B.1.617 व्हेरिएन्टचे तीन प्रकार आहेत.  B.1.617.1, B.1.617.2 आणि B.1.617.3. मिळालेल्या माहितीनुसार वेग-वेगळ्या देशांमध्ये आणि क्षेत्रांमध्ये 25 मे पर्यंत कोरोना व्हायरसच्या B.1.617 स्ट्रेनचे तीन प्रकार आढळले आहेत. 

सप्टेंबर महिन्यात यूकेमध्ये सापडलेल्या नव्या व्हेरिएन्टला 'अल्फा' असे नाव देण्यात आले आहे तर दक्षिण आफ्रिकेत आढळणारा प्रकार 'बीटा' म्हणून ओळखला जाईल. गेल्या वर्षी ब्राझीलमध्ये सापडलेल्या प्रकाराला 'गामा' असे नाव देण्यात आले आहे.