बापरे ! Coronavirus मुळं देशात ५० हजारहून अधिक मृत्यू

संसर्गाचं प्रमाणं नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरुच...

Updated: Aug 17, 2020, 10:15 AM IST
बापरे ! Coronavirus मुळं देशात ५० हजारहून अधिक मृत्यू  title=
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : Coronavirus कोरोना व्हायरसचा देशातील वाढणारा प्रादुर्भाव दिवसागणिक चिंता आणखी वाढवत आहे. कुठे कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आल्याचं चित्र दिसत असतानाच लगेचच रुग्णसंख्येत होणारी वाढ प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा यांच्यापुढं आव्हानं उभी करत आहे. अशा या परिस्थितीमध्ये सध्या चिंतेत टाकणारी बाब म्हणजे देशात कोरोनामुळं प्राण गमवावे लागेलल्यांची संख्या.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत देशात कोरोनामुळं दगावलेल्यांची संख्या ५० हजारांच्याही वर गेली आहे. सोमवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार देशात ५०९२१ कोरोनाबाधितांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर, मागील चोवीस तासांमध्ये ५७,९८२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेल्यांपैकी ९४१ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. 

कोरोना रुग्णांचा वेगाने वाढणारा आकडा पाहता देशभरातील एकूण रुग्णसंख्या आता, २६,४७,६६४ वर पोहोचली आहे. ज्यामध्ये ६,७६,९०० रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर, १९,१९,८४३ रुग्णांना कोरोनावर मात केल्यामुळं रुग्णालयांतून रजा देण्यात आली आहे. 

 

देशात कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या ही तुलनेनं जास्त असल्यामुळं ही काही अंशी दिलासादायक बाब ठरत आहे. असं असलं तरीही देशातील मृत्यूदरासोबतच रुग्णसंख्यावाढीवरही नियंत्रण मिळवण्याकडे आरोग्य यंत्रणांचा कल आहे. रुग्णसंख्या वाढीसाठीचा कालावधी आणि कोरोनावर मात करणाऱ्यांची दिलासादायक संख्या यामध्ये मदतीची ठरत आहे.