Chandrayaan-3 मोहिमेसाठी भारत सरकारने किती खर्च केला? समोर आली आकडेवारी

Cost Of Chandrayaan-3 Mission: चंद्रयान-3 आकाशात झेपावणार असून त्याची सर्व पूर्वतयारी झाली आहे. श्रीहरीकोटाच्या लॉन्चिंग पॅड 2 वरील तयारीचे फोटो समोर आले असून या मोहिमेसाठी करण्यात आलेला खर्चही सध्या चर्चेत आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 14, 2023, 09:31 AM IST
Chandrayaan-3 मोहिमेसाठी भारत सरकारने किती खर्च केला? समोर आली आकडेवारी title=
मागील अनेक दिवसांपासून आजच्या लॉन्चिंगची तयारी सुरु आहे

Cost Of Chandrayaan-3 Mission: आज भारताची चांद्रयान-3 मोहीमेअंतर्गत रॉकेट अवकाशात झेप घेणार आहे. आज म्हणजेच, 14 जुलै 2023 रोजी दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी चांद्रयान-3 (Chandrayaan-3) आकाशात झेप घेईल तो क्षण ऐतिहासिक ठरणार आहे. भारताच्या या तिसरी चंद्र मोहीम इस्रो एमव्हीएम-3 रॉकेटच्या माध्यमातून लॉन्चिंग होणार आहे.

केवळ 3 देशांना जमलंय हे काम...

श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरवरील दुसऱ्या लॉन्च पॅडवरुन चांद्रयान-3 लॉन्चिंग व्हेइकलच्या मदतीने आकाशात झेपावणार आहे. यासंदर्भातील तयारी पूर्ण झाली असून उलटं काऊण्ट डाऊन सुरु झालं आहे. भारताची ही तिसरी चांद्रयान मोहीम आहे. दुसऱ्यांदा भारत चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लॅण्डींगचा प्रयत्न करणार आहे. तसेच चांद्रयान-3 मधील रोव्हर चंद्रावर उतरवून तेथील माहिती मिळवण्याचा भारतीय शास्त्रज्ञांचा प्रयत्न आहे. यापूर्वी केवळ अमेरिका, रशिया आणि चीन या 3 देशांना यशस्वीपणे चंद्रावर सॉफ्ट लॅण्डींग करता आली आहे. चांद्रयान-2 मोहीम काही प्रमाणात यशस्वी ठरल्यानंतर आता चांद्रयान-3 च्या माध्यमातून भारताची मोहीम यशस्वी होईल अशी आशा सर्वच भारतीयांना आहे. यंदा चांद्रयान-3 मध्ये ऑर्बिटरचा समावेश नाही. यंदाचं चांद्रयान थेट प्रोपल्शन मॉड्यूलनुसार लॉन्च केलं जाईल. म्हणजेच एखादा उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत सोडला जातो तसं हे लॉन्चिंग असेल. मात्र चांद्रयान-3 मोहिमेसाठी नेमका किती खर्च आला? यापूर्वीच्या मोहिमांमध्ये किती पैसा खर्च करण्यात आला होता? इतर देशांनी किती खर्च केला आहे? यासारखे प्रश्न तुम्हालाही पडले असतील तर याचसंदर्भातील सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात...

चांद्रयान-1 चा खर्च किती?

भारताने चांद्रयान-1 मोहीम 22 ऑक्टोबर 2008 रोजी लॉन्च केली होती. ही मोहीम 28 ऑगस्ट 2009 पर्यंत सक्रीय होती. चंद्रावर पाण्याचा शोध या माध्यमातून घेण्यात आला. यासाठी 386 कोटी खर्च करण्यात आले.

चांद्रयान-2 साठी किती खर्च आला होता? 

चांद्रयान-2 च्या मोहीमेचा एकूण खर्च हा 'अवतार' आणि 'एव्हेंजर्स एण्डगेम' या चित्रपटांच्या निर्मितीच्या खर्चापेक्षाही कमी होता. 'एव्हेंजर्स एण्डगेम' चित्रपट निर्मितीसाठी 2443 कोटी तर अवतारच्या निर्मितीसाठी 3282 कोटींचा खर्च आला होता. चांद्रयान-2 च्या संपूर्ण मोहीमेचा खर्च 978 कोटी रुपये इतका होता. यामध्ये 603 कोटी मोहीमेचा खर्च आणि 375 कोटी रुपये लॉन्चिंगसाठी खर्च करण्यात आले होते. म्हणजेच लॉन्चिंगच्या रॉकेटच्या निर्मितीसाठी नंतरचा 375 कोटींचा खर्च आला होता.

इतर देशांनी किती खर्च केला आहे?

चीनच्या चांग-ई 4 या चंद्र मोहीमेचा खर्च 69.38 लाख कोटी रुपये इतका होता. तर अमेरिकने त्यांच्या चंद्र मोहीमेसाठी आतापर्यंत 825 लाख कोटी रुपये खर्च केले आहेत. म्हणजेच निल आर्मस्ट्रॉग यांच्या चंद्र मोहीमेपासून आतापर्यंतचा हा खर्च आहे. रशियाने चंद्र मोहिमांसाठी आतापर्यंत एकूण 165 कोटी रुपये खर्च केले आहेत. या तुलनेत भारताच्या चंद्र मोहिमा फारच स्वस्तात झाल्या आहेत.

चांद्रयान-3 साठी किती खर्च आला?

इस्रोने चांद्रयान-3 चं सुरुवातीचं बजेट 600 कोटी पर्यंत असेल अशी शक्यता व्यक्त केली होती. मात्र या प्रकल्पासाठी एकीण 615 कोटींचा खर्च आला आहे. त्यामुळेच चांद्रयान-3 हे भारताचं सर्वात महागडी मोहीम नसल्याचं आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. या सर्व चंद्र मोहिमांना लागणारा खर्च भारत सरकार करतं.