जमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील 6 जणांची हत्या; आठवडाभर सुरु होती हत्येची मालिका

Telangana Crime :  तेलगंणात जमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील सहा जणांची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका 20 वर्षीय तरुणाने ही हत्या केल्याचे म्हटलं जात आहे. पोलीस अद्यापही इतर मृतदेहांचा शोध घेत आहेत.

आकाश नेटके | Updated: Dec 19, 2023, 10:47 AM IST
जमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील 6 जणांची हत्या; आठवडाभर सुरु होती हत्येची मालिका title=

Telangana Crime : तेलंगणातून एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. संपत्तीच्या वादातून एका तरुणाने एकाच कुटुंबातील सहा जणांची निर्घृणपणे हत्या केली आहे. 20 वर्षीय तरुणाने एकाच कुटुंबातील सहा जणांची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये दोन मुलांचाही समावेश आहे. मालमत्तेच्या वादातून ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आठवडाभरात वेगवेगळ्या दिवशी या सर्व हत्या करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेने परिसरातील नागरिक हादरले आहेत.

तेलंगणातील मकलूर येथे एका 20 वर्षीय तरुणाने जमीन हडप करण्यासाठी एकाच कुटुंबातील सहा जणांची हत्या केली. मात्र, पोलिसांना केवळ चार अनोळखी मृतदेह शोधण्यात यश आले आहे. पोलिसांना प्राथमिक तपासात सर्व प्रकरणांमध्ये एका व्यक्तीचा सहभाग असल्याचे दिसून आलं आहे. या घटनेमुळे पोलिसांनाही जबर धक्का बसला आहे. मृतांमध्ये मकलूर गावातील रहिवासी मंगली प्रसाद आणि त्यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी, दोन मुले आणि दोन बहिणी यांचा समावेश आहे. हे कुटुंब मकलूर सोडून कामरेड्डी जिल्ह्यातील माचरेड्डी गावात स्थायिक झाले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 डिसेंबरपासून सुरू झालेले हे हत्याकांड आठवडाभर सुरू होते. या हत्याकांडामध्ये एकाच कुटुंबातील 6 जणांची निर्घृण हत्या करण्यात आली. 14 डिसेंबर रोजी कामारेड्डी जिल्ह्यातील सदाशिव नगर पोलीस ठाण्याच्या परिसरात एका अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला होता. तो मृतदेह पूर्णपणे जळाला होता. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून दोन संशयितांना अटक केली होती. त्यानंतर यानंतर मेडक जिल्ह्यात आणखी एका महिलेचा मृतदेहसुद्धा तशाच अवस्थेत सापडला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता दोन्ही महिला सख्ख्या बहिणी असल्याचे समोर आलं.

त्यानंतर पोलिसांना निजामाबाद जिल्ह्यातून दोन मुलांचे मृतदेह सापडले. एका पुलाखाली मुलांचे मृतदेह पडले होते. त्यानंतर आणखी तपास केला असता पोलिसांना मृत लहान मुले आणि महिला या दोघांचाही संबंध असल्याचे समोर आले आहे. हे सर्वजण एकाच कुटुंबातील असल्याचे समोर आल्यानंतर तेलंगणात एकच खळबळ उडाली.

चौकशीदरम्यान मृतांच्या नातेवाइकांनी सांगितले की, दोन्ही मृत मुलांचे पालकसुद्धा बेपत्ता आहेत. त्यांच्या कामारेड्डी येथील घरालाही कुलूप आहे. त्याचाही खून झाला असावा, असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. मुलांच्या वडिलांनी त्यांची संपूर्ण मालमत्ता स्वतःच्या नावावर हस्तांतरित केली होती. त्यांनी मालमत्ता परत करण्यास नकार दिला होता. याच प्रकरणावरून अनेकदा मोठे वाद देखील झाले होते. मालमत्तेच्या कारणावरून ही हत्या झाल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.

दुसरीकडे, जेव्हा प्रसाद कुटुंब माचरेड्डी येथे राहत होते, तेव्हा त्यांच्या मॅक्लुरे येथील घराची देखरेख मंगली प्रसादचा मित्र गोल्लू प्रशांत करत होता. मंगली प्रसादला त्याच्या मालमत्तेवर कर्ज घेण्यास अडचण येऊ लागल्याने त्याने ती गोल्लू प्रशांतच्या नावे हस्तांतरित केली होती. जेव्हा कर्जाची परतफेड करायची वेळ आली तेव्हा प्रसादने प्रशांतला मालमत्ता परत करण्यास सांगितले. मात्र प्रशांतने त्याला नकार दिला. त्यानंतर निजामाबाद-कामारेड्डी राष्ट्रीय महामार्गालगतच्या जंगल परिसरात प्रसादची हत्या झाल्याची माहिती समोर आली. या प्रकारानंतर प्रसादच्या पत्नीची हत्या करण्यात आली. प्रशांतने तिला सांगितले होते की प्रसादला अटक करण्यात आली आहे. खोटं बोलून प्रशांतने प्रसादच्या पत्नीची हत्या केली आणि तिचा मृतदेह बसरा येथील नदीत टाकून दिला.

त्यानंतर प्रशांतने प्रसादच्या मोठ्या बहीणींची आणि दोन मुलांची हत्या केली. पोलिसांना तपासात यामागे एकाच व्यक्तीचा हात असल्याचे आढळून आले.  याप्रकरणी काही महत्त्वाचे सुगावा लागला आहे. पुढील तपास करण्यात येत आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे.