#CycloneBiparjoy : बिपरजॉय चक्रिवादळापुढे बलाढ्य जहाजही निकामी; पाहा वादळाची तीव्रता दाखवणारा VIDEO

Cyclone Biparjoy : अरबी समुद्रात सुरु झालेल्या चक्रिवादळसदृश वाऱ्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये रौद्र रुप धारण केलं आणि देशाच्या बहुतांश किनारपट्टी भागामध्ये या वादळाचे परिणाम दिसून आले

सायली पाटील | Updated: Jun 13, 2023, 07:58 AM IST
#CycloneBiparjoy : बिपरजॉय चक्रिवादळापुढे बलाढ्य जहाजही निकामी; पाहा वादळाची तीव्रता दाखवणारा VIDEO  title=
cyclone Biparjoy hits Indian Coast Guard massive tides arises watch video

Cyclone Biparjoy : सुरुवातीला बिपरजॉय चक्रिवादळामुळं  महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागाला तडाखा बसण्याची चिन्हं असतानाच वादळानं दिशा बदलली आणि ते मुंबई, (Maharashtra coast) महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागातून थेट गुजरातच्या दिशेनं पुढे सरकलं आहेत. हवमानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार हे वादळ गुजरातमधून सौराष्ट्र, कच्छहून थेट पाकिस्तानच्या दिशेनं पुढे जात आहे. परिणामी वादळाचा लँडफॉल आता सुरु झाला असून, 15 जूनला त्याचे परिणाम गुजरातमध्ये दिसून येणार आहेत. 

गुजरातमध्ये वादळामुळं उदभवणारी एकंदर परिस्थिती पाहता मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला असून NDRF ची पथकंही तैनात ठेवण्यात आली आहेत. इथं महाराष्ट्रातच समुद्र खवळला असल्याचं चित्र असताना गुजरातच्या किनारपट्टी भागात तर परिस्थिती अतिशय वाईट असल्याचं समजलं जात आहे. 

एएआय या वृत्तसंस्थेनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार गुजरातच्या किनाऱ्यांपाशी भारतीय तटरक्षक दलांच्या बलाढ्य जहाजांनाही या चक्रिवादळाचा तडाखा बसला आहे. सोशल मीडियावर वृत्तसंस्थेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका व्हिडीओमध्ये भल्यामोठ्या जहाजापुढेही समुद्राच्या पाण्याची वाढलेली पातळी आणि उसळणाऱ्या लाटा धडकी भरवत आहेत. तितक्यातच एक उंच लाट जहाजावर धडकून फेसाळली आणि सर्वांनाच वादळाच्या तीव्रतेची जाणीव झाली. 

हेसुद्धा वाचा : मान्सूनबाबत महत्त्वाची अपडेट, आता 'या' तारखेपासून मुंबई-पुण्यात पावसाचा जोर वाढणार

 

भारतीय तटरक्षक दलाकडून सध्याच्या घडीला वादळानं प्रभावित भागांमध्ये बचावकार्यासही सुरुवात करण्यात आली आहे. ज्याअंतर्गत सध्याच्या घडीला द्वाककेपाशी असणाऱ्या गुजरातच्या समुद्रातील तेल विहिरीवर काम करणाऱ्या 11 कर्मचाऱ्यांना एअरलिफ्ट करण्यात आलं. 

मुंबईच्या विमानतळावरही यंत्रणा सतर्क 

चक्रिवादळाचे परिणाम फक्तच किनारपट्टी भागातच दिसत नसून, रस्ते आणि हवाई वाहतुकीवरही त्याचे परिणाम होताना दिसत आहेत. इथं मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरही यंत्रणा सध्याच्या घडीला सर्वतोपरी काळजी घेत असून, आपात्कालीन परिस्थितीवर नजर ठेवून आहे. 

वादळाचा पुढचा प्रवास कसा असेल? 

बिपरजॉय चक्रिवादळ आता पुढे गुजरातच्या जाखाऊ बंदर भागात पोहोचून तिथं 15 जूनला चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. या भागात साधारण 125 ते 135 किमी वेगाने वारे वाहतील अशी शक्यताही वर्तवण्यात आली आहे. इथून पुढे हे वादळ कराचीमध्ये धडकणार आहे. जिथं वाऱ्यांचा वेग वाढून ताशी 145 ते 150 किमी पर्यंत जाण्याचा अंदाज आहे. चक्रीवादळाचा परिणाम म्हणून गोवा, कोकण किनारपट्टी आणि मुंबईत सोमवारी ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगानं वारे वाहतील. तर, मुंबईसह कोकण किनारपट्टीवर हलक्या पावसाची शक्यता आहे.