वरात घेऊन निघण्याआधीच लग्नघरातून निघाली अंत्ययात्रा; 5 स्फोटांत वरासह 60 जण गंभीरित्या भाजले

Jodhpur Cylinder Blast : लग्नसमारंभात पाच गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने एकच गोंधळ उडाला. या अपघातात  आई-वडिलांसह 60 जण भाजले आहेत

Updated: Dec 9, 2022, 09:51 AM IST
वरात घेऊन निघण्याआधीच लग्नघरातून निघाली अंत्ययात्रा; 5 स्फोटांत वरासह 60 जण गंभीरित्या भाजले title=

Cylinder Blast : सध्या देशभरात लग्नसराई सुरु असल्याचे पाहायला मिळतंय. त्यामुळे लग्न घरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पण राजस्थानच्या जोधपूरमध्ये (jodhpur) एका लग्नघरात आनंदावर विर्जण पडलय. जोधपूरच्या एका लग्न समारंभात एका पाठोपाठ पाच सिलिंडरच्या स्फोटानंतर मोठा गोंधळ उडाला. या घटनेत वरासह त्याच्या आई-वडील आणि 60 नातेवाईक होरपळले आहेत. तर दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

दुपारच्या वेळी भयंकर स्फोट

शेरगडच्या भूंगरा गावात गुरुवारी दुपारी सव्वा तीन वाजता हा सर्व प्रकार घडलाय. गावातील तख्त सिंह नावाच्या व्यक्तीच्या घरात लग्न होतं. घरातून वरात निघणार होती तितक्यातच हे स्फोट झाले. या स्फोटानंतर आजूबाजूचा परिसर हादरुन गेलाय. लोकांनी तात्काळ जखमींना रुग्णालयात दाखल करण्यास सुरुवात केली.

घराच्या भिंती कोसळल्या

सिलिंडरच्या स्फोटानंतर घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या अपघातात नवरदेव देखील गंभीररित्या भाजला आहे. हे स्फोट इतके भयंकर होते की घराच्या भिंतीदेखील कोसळल्या आहेत. अपघातानंतर जखमींना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस अधिक्षकांनीही घटनास्थळी धाव घेत तपास सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. जखमींपैकी आठ जण हे 90 टक्के भाजले असून एका मुलावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. 

स्फोटावेळी नक्की काय झालं?

जिथे ही घटना घडली त्या ठिकाणी मोठ्या संख्येने वऱ्हाडी उपस्थित होते. ग्रामीण पोलीस अधिक्षक अनिल कायल यांनी सांगितले की, पाच सिलिंडरचा स्फोटा झाल्यामुळे हा अपघात झाला. स्वयंपाक करत असताना अचानक सिलिंडर लिक होऊन आग लागली. त्यामुळे जवळच्या पाच सिलिंडरलाही आग लागली आणि स्फोट होऊ लागले. सिलिंडरचा स्फोट झाला तेव्हा जवळपास 100 लोक उपस्थित होते.

अपघाताची माहिती मिळताच जोधपूरच्या महात्मा गांधी रुग्णालय व्यवस्थापनाला या घटनेची माहिती देण्यात आली. संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास एकामागून एक जखमी आल्याने रुग्णालयात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. लग्न समारंभाच्या वेळी हॉलमध्ये महिला बसून बोलत होत्या. यावेळी सिलेंडरचा स्फोट झाला. जखमींमध्ये महिलांची संख्या अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे.