दिल्लीत डिझेल झाले स्वस्त, केजरीवाल सरकारने डिझेलवरील व्हॅट केला कमी

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीकरांना मोठी भेट दिली आहे.  

Updated: Jul 30, 2020, 01:37 PM IST
दिल्लीत डिझेल झाले स्वस्त, केजरीवाल सरकारने डिझेलवरील व्हॅट केला कमी   title=

नवी दिल्ली : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीकरांना मोठी भेट दिली आहे. इंधनावरील व्हॅट कमी केल्याने डिझेलची वाढलेली किंमत कमी होणार आहे. दिल्लीत पेट्रोलपेक्षा डिझेल महाग झाले होते. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत होती. डिझेल दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसत होता. तसेच महागाईतही वाढ झाली होती. कोविड-१९च्या संकटात लॉकडाऊन लागू आहे. त्यातच महागाईत वाढ होत असल्याने दिल्लीकर त्रस्त होते.

दिल्ली सरकारने मंत्रिमंडळाने गुरुवारी डिझेलवरील व्हॅट ३० टक्यांवरून १६.७५ टक्के केला आहे. तसा मंत्रिमंडळाने व्हॅटदर कमी करण्याचा निर्णय घेतला. यामुळे दिल्लीतील डिझेलची किंमत ८२ रुपयांवरुन आता ७३.६४ रुपयांवर खाली येणार आहे. प्रति लिटरमागे आता ८.३६ पैसे कमी मोजावे लागणार आहेत. 

 मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत डिझेलवरील व्हॅट कमी करण्याचा हा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यास हा निर्णय नक्कीच मदत करेल. अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन देणे हे एक मोठे आव्हान असेल, परंतु लोकांच्या सहकार्याने ते साध्य करता येईल, असे मत मुख्ममंत्री केजरीवाल यांनी या निर्णयानंतर व्यक्त केले.

केजरीवाल म्हणाले की, शहरातील व्यापारी आणि उद्योजकांनी डिझेलचे दर कमी करण्याची मागणी केली होती. त्यांची ही मागणी लक्षात घेता डिझेलवरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता दिल्लीकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. इंधनाच्या किंमतीत ही कपात झाली असून, दिल्लीत डिझेल आता स्वस्त झाले आहे. राजस्थानमध्ये एक लिटर डिझेलची किंमत ८२.६४ रुपये आहे, मध्य प्रदेशात ८१.२९ रुपये, महाराष्ट्रात  ७९.८१ रुपये, छत्तीगडमध्ये एक लिटर डिझेलसाठी ७९.६८  रुपये मोजावा लागतो, तर गुजरातमध्ये एक लिटर डिझेलची किंमत ७९.०५ रुपये आहे.