'माझं आयुष्य पूर्णपणे...,' अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी रात्री ईडीने अटक केली आहे. दरम्यान अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली असून मी जेलच्या आत असो किंवा बाहेर, माझं आयुष्य देशासाठी समर्पित आहे असं ते म्हणाले आहेत.   

शिवराज यादव | Updated: Mar 22, 2024, 04:41 PM IST
'माझं आयुष्य पूर्णपणे...,' अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया title=

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपलं आयुष्य देशाला समर्पित असल्याचं म्हटलं आहे. मी जेलमध्ये असो किंवा बाहेर असलो तरी त्याच्याने फरक पडत नाही असंही ते म्हणाले आहेत. अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी रात्री ईडीने अटक केली आहे. अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. कोर्टात हजर केलं जात असताना त्यांनी माध्यमांसमोर सांगितलं की, "माझं आयुष्य देशासाठी समर्पित आहे, मग मी जेलमध्ये किंवा बाहेर असलो तरी त्याच्याने फरक पडत नाही".

अरविंद केजरीवाल यांना ईडीने दिल्लीतील मद्यगैरव्यहारप्रकरणी अटक केली आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर असताना अरविंद केजरीवाल अटक झालेले पहिले मुख्यमंत्री आहेत. ईडीने मद्यगैरव्यहारप्रकरणी  अरविंद केजरीवाल यांना अनेकदा चौकशीसाठी बोलावलं गेलं होतं. मात्र त्यांनी हजर राहण्यास नकार दिला होता. मनिष सिसोदिया आणि संजय सिंग यांना मुख्य आरोपी ठरवण्यात आलं असून दोघेही अबकारी शुल्क धोरण ठरवताना केजरीवाल यांच्या संपर्कात होते असा ईडीचा दावा आहे.

ईडीने अरविंद केजरीवाल यांना कोर्टात हजर केलं असता ईडीने 10 दिवसांच्या कोठडीची मागणी केली आहे. मद्यगैरव्यहारप्रकरणी अरविंद केजरीवाल कारस्थान रचणारे मुख्य आरोपी असल्याचा ईडीचा आरोप आहे. हायकोर्टाने अरविंद केजरीवाल यांची अटकेपासून संरक्षण देण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावत अटकेची कारवाई करण्यात आली. 

ईडीने केलेल्या आरोपानुसार, दिल्ली उत्पादन शुल्क धोरण 2021-22 तयार करण्यासाठी आणि अंमलबजावणी करण्यासाठी केजरीवाल यांना 'साऊथ ग्रुप'कडून अनेक कोटी रुपये मिळाले.पंजाब निवडणूक लढवण्यासाठी केजरीवाल यांनी 'साऊथ ग्रुप'मधील काही आरोपींकडून 100 कोटी रुपयांची मागणी केली, असा आरोप ईडीची बाजू मांडणारे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल (ASG) एसव्ही राजू यांनी राऊस एव्हेन्यू कोर्टात केला .

अण्णा हजारेंची टीका

"अरविंद केजरीवालसारखा व्यक्ती माझ्याबरोबर काम करताना दारुविरुद्ध आवाज उठवत होता. आत तोच व्यक्ती दारु बनवत आहे याचं मला दु:ख झालं. मात्र करणार काय? सत्तेसमोर काहीही करता येत नाही. त्याला जी अटक करण्यात आली आहे ती त्याच्या कृतीमुळे झाली. त्याने ती कृती केली नसती तर त्याला अटक झाली नसती. आता अटक झाल्यानंतर कायदेशीररित्या पुढे प्रक्रिया होईल. त्यासंदर्भातील कारवाई कायदा आणि सरकार पाहील. तेच ठरवतील योग्य काय आणि वाईट काय," असं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणाले आहेत.