"लुंगी आणि Nighties घालून पॅसेजमध्ये..."; सोसायटीच्या नोटीसमुळे नव्या वादाला फुटलं तोंड

Society Notice For Residents: यापूर्वीही या संस्थेनं जारी केलेल्या नोटीशींमुळे वाद निर्माण झाले होते. यात अगदी पाहुण्यांनी कधी यावं आणि कधी जावं यासंदर्भातील वेळाही निश्चित करण्यात आल्याच्या वादाचाही समावेश होता.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 16, 2023, 02:04 PM IST
"लुंगी आणि Nighties घालून पॅसेजमध्ये..."; सोसायटीच्या नोटीसमुळे नव्या वादाला फुटलं तोंड title=
या नोटीसमुळे नव्या वादाला फुटलं तोंड

Society Notice For Residents: महाराष्ट्रामधील मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू करण्याच्या मुद्द्यावरुन राज्यात मागील काही आठवड्यांपासून चर्चा सुरु आहे. अनेक मंदिरांमध्ये असे ड्रेस कोड लागूही करण्यात आले आहेत. मात्र दुसरीकडे सध्या दिल्लीमधील रेसिडन्ट वेलफेअर असोसिएशनमध्ये (आरडब्ल्यूए) सार्वजनिक ठिकाणी कशी कपडे घालून फिरावं यावरुन नवीन वादाला तोंड फुटला आहे. नवी दिल्लीजवळील ग्रेटर नोएडामधील रहिवाश्यांना लुंगी आणि नाईटी घालून सोसायटीमध्ये सार्वजनिक ठिकाणी फिरु नका असे निर्देश देण्यात आले आहेत. यावरुन नवीन वादाला तोंड फुटलं आहे.

नेमकं काय सांगण्यात आलं आहे?

सोसायटीच्या आवारामध्ये लुंगी आणि नाईटीमध्ये फिरणाऱ्यांना अशाप्रकारची वागणूक टाळावी असा इशारा देणारी नोटीस झळकावण्यात आली आहे. "आपण सर्वांना एका विशेष गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे ती गोष्ट म्हणजे सोसायटीमध्ये वावरताना तुमचं वागणं हे आक्षेपार्ह असता कामा नये. तुमची मुलं तुमच्याकडे पाहून शिकतात. त्यामुळेच तुम्ही ज्याप्रकारे घरात लुंगी आणि नाईटी घालून फिरता तसं सोसायटीच्या आवारामध्ये फिरु नये," असं आरडब्ल्यूएमधील सदस्य सोसायटी असलेल्या हिमसागर सोसायटीमधील फेज-2 मध्ये 10 जून रोजी लावण्यात आली आहे. सोशल मीडियावर ही नोटीस व्हायरल झाल्यानंतर यावरुन नव्या वादाला तोंड फुटलं आहे. 

विरोध आणि पाठिंबाही

या नोटीसवरुन आरडब्ल्यूएला लक्ष्य केलं आहे. लोकांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये, त्यांनी कोणते कपडे परिधान करावेत यामध्ये ढवळाढवळ करण्याचा हा प्रकार आहे अशी टीका काहींनी केली आहे. मात्र काहींनी सार्वजनिक ठिकाणी म्हणजेच बगीचा, पॅसेज अशा ठिकाणी घरातील कपडे घालून न फिरण्याच्या सूचना योग्यच असल्याचं म्हणत आरडब्ल्यूएच्या निर्णयाची पाठराणख केली आहे. 

...म्हणून काढली नोटीस

आरडब्ल्यूएचे अध्यक्ष असलेल्या जी. के. कालरा यांनी काही महिलांनी तक्रार केल्यानंतर ही नोटीस जारी करण्यात आल्याचं सांगितलं. "काही दिवसांपूर्वी काही महिलांनी आमच्याकडे तक्रार केली होती. काही वयस्कर रहिवाशी लुंगीमध्येच पार्कमध्ये योगा करत होते, असं या तक्रारीत म्हटलं होतं. आम्ही आधी या लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतरच नोटीस लावली," असं कालरा म्हणाले. 

यापूर्वीही वाद

यापूर्वीही आरडब्ल्यूए काही निर्णयांमुळे वादात अडकली होती. अविवाहित लोकांना घर भाड्याने देऊ नये त्याचबरोबर पाहुणे कधी येणार, कधी जाणार यासंदर्भातील वेळा ठरवून देण्यासारख्या निर्णयांमुळे ही संघटना यापूर्वीही अडचणीत अडकलेली. आता लुंगी आणि नाईटीसंदर्भातील नियमावरुन पुन्हा वाद सुरु झाला आहे. मात्र असं असलं तरी आरडब्ल्यूएच्या नियमांचं पालन करणं सोसायटीमधील रहिवाशांना बंधनकारक असतं. त्यामुळे अशाप्रकरणांमध्ये ते काहीही करु शकत नाहीत.