ओमायक्रॉनला हलक्यात घेऊ नका, दररोज वाढू शकतात 14 लाख प्रकरणं- सरकारचा गंभीर इशारा

भारतात ही ओमायक्रॉनचा धोका हळूहळू वाढत आहे. त्यामुळे सरकारने आता सावधगिरीचा इशारा दिला आहे.

Updated: Dec 17, 2021, 10:12 PM IST
ओमायक्रॉनला हलक्यात घेऊ नका, दररोज वाढू शकतात 14 लाख प्रकरणं- सरकारचा गंभीर इशारा title=

मुंबई : सरकारने लोकांना कोरोनाचा नवीन प्रकार, ओमायक्रॉनबद्दल सावध केले आहे. सरकारने म्हटलं की, याला हलक्यात घेऊ नका. जरी याची लागण झालेल्यांमध्ये सौम्य लक्षणे दिसत असली तरी तो झपाट्याने लोकांना संक्रमित करत आहे. यासाठी सरकारने आफ्रिका आणि युरोप तसेच ब्रिटनसारख्या देशांची उदाहरणे दिली आहेत, जिथे कोरोनाचे नवीन रुग्ण विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहेत.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी ओमायक्रॉनबाबत इशारा देताना सांगितले की, प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होत असताना आरोग्याच्या पायाभूत सुविधांवरील भार वाढणे स्वाभाविक आहे. देशातील 24 जिल्ह्यांमध्ये संसर्गाचे प्रमाण पाच टक्क्यांहून अधिक असल्याबद्दल चिंता व्यक्त करत त्यांनी चाचणी वाढवून ती लवकरात लवकर पाच टक्क्यांपर्यंत खाली आणण्यावर भर दिला. 

Omicron verient या प्रकाराने संक्रमित झालेल्यांना आणि त्यांच्या संपर्कात आलेल्यांना त्वरित संपर्क करुन क्वारंटाईन करणं आवश्यक आहे.

ओमायक्रॉनच्या धोक्याबद्दल सावधगिरी बाळगत, नीती आयोगाचे सदस्य आणि कोरोना लसीकरण टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. व्ही.के. पाल यांनी लोकांना कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळण्याचे आणि लसीचे दोन्ही डोस घेण्याचे आवाहन केले.

जगातील अनेक देशांतील कोरोना संसर्गाच्या भीषण परिस्थितीची आकडेवारी देताना डॉ.पाल म्हणाले की, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी वारंवार हात धुणे, योग्य अंतर राखणे, मास्क घालणे या पद्धतींचे काटेकोरपणे पालन करण्यासोबतच अनावश्यक प्रवासही करणे टाळवा. त्यांनी लोकांना सण आणि इतर धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, हिवाळ्यात विषाणू वेगाने पसरण्याचा धोका असतो, त्यामुळे नववर्ष साजरे करताना काळजी घेण्याची गरज आहे.

देशात आणि संपूर्ण जगात ओमायक्रॉन प्रकाराच्या संसर्गाविषयी माहिती देताना, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल म्हणाले की, भारतातील 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आतापर्यंत 101 संक्रमित लोकांची पुष्टी झाली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 32, दिल्लीतील 22, राजस्थानमधील 17, कर्नाटक आणि तेलंगणातील प्रत्येकी 8, गुजरात आणि केरळमधील प्रत्येकी 5 आणि आंध्र प्रदेश, चंदीगड, तामिळनाडू आणि बंगालमधील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

यातील बहुतांश प्रवासी हे परदेशातून आलेले आणि त्यांच्या संपर्कात आलेले लोक आहेत. ते म्हणाले की बंगळुरूमध्ये असा एकच संक्रमित आढळला आहे, ज्याची परदेशात जाण्याची किंवा परदेशातून आलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या संपर्कात आल्याची नोंद नाही. यावरून हे स्पष्ट होते की ओमायक्रॉन प्रकाराचा व्यापक संसर्ग देशात अद्याप सुरू झालेला नाही, परंतु परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

परदेशात ओमिक्रॉनची प्रकरणे वाढू लागली

डॉ.पाल म्हणाले की, गेल्या आठवडाभरात आफ्रिका आणि युरोपातील अनेक देशांमध्ये परिस्थिती बिकट झाली आहे. दक्षिण आफ्रिकेतील संसर्ग दिवसभरात 24,785 च्या उच्चांकावर पोहोचला आहे, त्यापैकी 98 टक्के ओमिक्रॉन प्रकार आढळून आले आहेत. त्याचप्रमाणे, नॉर्वेमध्ये 18 टक्के ओमायक्रॉन प्रकारासह 4,520 प्रकरणे, कॅनडामध्ये 9.6 टक्के ओमायक्रॉन प्रकारासह 7,335 आणि यूकेमध्ये 2.4 टक्के ओमायक्रॉन प्रकारासह 88,042 प्रकरणे दररोज सर्वोच्च पातळीवर गेली आहेत. त्यांच्या मते, युरोपमध्ये ही परिस्थिती अधिक चिंताजनक आहे कारण तेथे डेल्टा प्रकाराचा मोठ्या प्रमाणावर संसर्ग झाला होता आणि 70-80 टक्के लोकसंख्येचे लसीकरणही झाले आहे. अशा परिस्थितीत, ओमायक्रॉन प्रकारामुळे, संसर्गाची नवीन उंची गाठणे हे धोकादायक लक्षण आहे.

भारतात दररोज 14 लाखांपर्यंत केसेस येऊ शकतात

डॉ.पाल म्हणाले की, ब्रिटनच्या लोकसंख्येनुसार दररोज येणाऱ्या केसेसची भारताच्या लोकसंख्येशी तुलना केली, तर भारतात दररोज 88 हजार केसेसची संख्या 14 लाखांपेक्षा जास्त असू शकते. दुसऱ्या लाटेदरम्यान, देशातील संक्रमितांची संख्या दररोज चार लाखांच्या पुढे गेली होती. ते म्हणाले की, सध्या ब्रिटन आणि इतर देशांमध्ये संसर्ग सौम्य स्वरूपाचे आहेत आणि आरोग्याच्या पायाभूत सुविधांवर कोणताही दबाव नाही.