'चालक क्रिकेटची मॅच बघत होता अन्...', ट्रेन अपघातावर रेल्वेमंत्र्यांचा धक्कादायक खुलासा!

Railway minister On Andhra Pradesh Train Collision : ज्यावेळी हा अपघात झाला तेव्हा, पॅसेंजर ट्रेनचे चालक आणि सहाय्यक चालक मोबाईलवर क्रिकेट सामना पाहत होते, असं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.

Updated: Mar 3, 2024, 04:12 PM IST
'चालक क्रिकेटची मॅच बघत होता अन्...', ट्रेन अपघातावर रेल्वेमंत्र्यांचा धक्कादायक खुलासा! title=
Ashwini Vaishnaw on Andhra Pradesh Train Collision

Andhra Pradesh Train Collision : भारतात रेल्वे अपघाताचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचं चित्र आहे. दोन दिवसांपूर्वी झारखंडमधील जामतारा येथे भीषण रेल्वे अपघात झाला होता. ट्रॅकवरुन चालणाऱ्या प्रवाशांवरुन रेल्वे धावली. या अपघातात दोन प्रवासी ठार झाले तर अनेकजण जखमी झाल्याची माहिती होती. अशातच आता 29 ऑक्टोबर 2023 रोजी आंध्र प्रदेशातील विजयनगरम जिल्ह्यातील कंटकपल्ली येथे झालेल्या भीषण रेल्वे दुर्घटनेचं कारण समोर आलं आहे. कंटकपल्ली येथील अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला तर 50 रेल्वे प्रवासी जखमी झाले होते. यावर आता रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पीटीआयला महत्त्वाची माहिती दिली आहे. 

ज्यावेळी हा अपघात झाला तेव्हा, पॅसेंजर ट्रेनचे चालक आणि सहाय्यक चालक मोबाईलवर क्रिकेट सामना पाहत होते, असं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. लोको पायलट आणि सहाय्यक पायलट दोघंही क्रिकेटची मॅच खेळत असल्याने त्यांचं रेल्वेकडं लक्ष नव्हतं. त्यामुळे ही दुर्घटना घडली, अशी कबुली रेल्वेमंत्र्यांनी दिली आहे. अशातच आता पायलट आणि सहाय्यक पायलट यांना ट्रेनिंग देऊन किंवा खास प्रणाली कशी प्रस्थापित करता येईल आणि त्यावर आम्ही उपाय शोधत आहोत, असंही आश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे.

आम्ही सुरक्षेवर आमचे लक्ष केंद्रित करू. आम्ही प्रत्येक घटनेचे मूळ कारण शोधण्याचा प्रयत्न करतो आणि त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आम्ही त्यावर उपाय शोधतोय, असंही आश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्तांचा (CRS) अधिकृत अहवाल अद्याप जाहीर झाला नसला तरी, अपघातानंतर लगेचच रेल्वे अधिकाऱ्यांनी केलेल्या प्राथमिक तपासात पॅसेंजर ट्रेनचा चालक आणि सहाय्यक ड्रायव्हर या टक्करमागे दोषी असल्याचे आढळून आलं आहे.

नेमकं काय झालं होतं?

विशाखापट्टणम-रायगडा पॅसेंजर ट्रेन ओव्हरहेड केबल कट झाल्यामुळे उभी होती. त्याचवेळी विशाखापट्टणम-पलासा पॅसेंजर ट्रेन त्याच रुळावर मागून येऊन धडकली. या धडकेनंतर पॅसेंजर ट्रेनच्या तीन बोगी रुळावरून घसरल्या. ही धडक इतकी जोरदार होती की एका बोगीचे मोठे नुकसान झालं होतं. या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला होता. तर 50 हून अधिक लोक जखमी झाले होते.