'वस्तू कोणत्या देशाची, ते सांगा', सरकारचे ई-कॉमर्स कंपन्यांना आदेश

केंद्र सरकारने चीनी कंपन्यांवर बहिष्काराच्या मोहिमेत आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे. 

Updated: Jul 8, 2020, 09:29 PM IST
'वस्तू कोणत्या देशाची, ते सांगा', सरकारचे ई-कॉमर्स कंपन्यांना आदेश title=

नवी दिल्ली : केंद्र सरकारने चीनी कंपन्यांवर बहिष्काराच्या मोहिमेत आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे. सगळ्या ई-कॉमर्स कंपन्यांना त्यांच्या वेबसाईटवर विकल्या जाणाऱ्या वस्तू कोणत्या देशात बनवण्यात आल्या, याबाबत माहिती द्यावी लागणार आहे. सरकारच्या या आदेशामुळे फ्लिपकार्ट, ऍमेझॉन यांच्यासारख्या वेबसाईट्सना वस्तू कोणत्या देशातून आल्या आहेत, हे सांगावं लागणार आहे.

वाणिज्य मंत्रालयाने ई-कॉमर्स कंपन्यांना १ ऑगस्टपासून या नियमाची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे १ ऑगस्टपासून या कंपन्यांना त्यांच्या वस्तूंचं country of origin सांगणं बंधनकारक असणार आहे. 

दुसरीकडे कंपन्यांनी या नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी आणखी थोडा वेळ मागितला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे चीनी माल विकणाऱ्यांच्या अडचणी वाढणार आहेत. कारण याआधी कोणतीच कंपनी त्यांच्याकडे असलेल्या वस्तू कोणत्या देशात बनवल्या आहेत, याबाबत माहिती देत नव्हती.

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयातल्या अधिकाऱ्याने दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, 'चीनला चहूबाजूंनी घेरण्याची तयारी झाली आहे. चीनला आर्थिक मुद्द्यावरून लक्ष्य केलं जाईल. यासाठी सरकारने रणनिती आखली आहे. यासोबतच भारतात येण्याआधी चीनी कंपन्यांची कडक तपासणी होईल.'

कंफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट)नेही ऑनलाईन कंपन्यांकडून विकण्यात येणाऱ्या वस्तूंच्या देशाची माहिती देण्यात यावी, अशी मागणी सरकारकडे केली होती. बहुतेक ई-कॉमर्स वेबसाईटवर चीनी वस्तू विकल्या जातात, असं कॅटचं म्हणणं आहे.